

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, प्रत्येक मतदारसंघातील पक्षाची सद्य:स्थिती आणि आगामी रणनीतीचा सखोल आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी बुधवारी तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक आणि पक्षाच्या मोजक्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकीत काही मतदारसंघांत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी सांगितले की, प्रदेश पातळीवरून आमदार आणि मंत्र्यांच्या कामगिरीचे अहवाल नियमितपणे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविले जातात. त्याच आधारे या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघातील सध्याची परिस्थिती आणि पुढील दोन महिन्यांत संघटनात्मकदृष्ट्या कोणती प्रगती अपेक्षित आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत कोणत्याही संभाव्य उमेदवाराच्या नावाची चर्चा झाली नसली, तरी विजयाची शक्यता अधिक बळकट करण्यासाठी कोणत्या मतदारसंघांत बदल आवश्यक आहेत, याबाबत संकेत मिळाल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यानुसार संघटनात्मक स्तरावर आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. तसेच, राष्ट्रीय नेतृत्वाकडून दिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत स्थानिक पातळीवर कोणाचे सहकार्य मिळत आहे आणि कोणाचे अपेक्षित आहे, याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
महिनाभरात दुसऱ्यांदा गोवा दौऱ्यावर आलेले बी. एल. संतोष हे दिल्लीहून कर्नाटकात जाताना मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. तेथून बेळगावला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पणजी येथील प्रदेश भाजप कार्यालयात बैठक घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्त पदे तत्काळ भरण्याच्या सूचना
सूत्रांच्या माहितीनुसार, बी. एल. संतोष यांनी बैठकीत शासन आणि पक्षाशी संबंधित रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची सूचना केली. यात मंत्रिमंडळातील रिक्त जागांसह विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि संचालकपदांच्या रिक्त जागांचाही समावेश असल्याचे समजते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.