पणजी: सध्या मंत्री आणि आमदारांकडून सरकारवर होणारी टीका चर्चेचा विषय ठरली आहे. याची गाज पार दिल्लीपर्यंत पोचू लागली आहे. असे हे का घडत असावे, हा प्रश्न आहे. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपच्या पक्षशिस्तीच्या चौकटीला तडे जाऊ लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपमध्ये बाहेरून आलेले नेते-कार्यकर्त्यांमुळे असे होत आहे, असे कारण पुढे केले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासारखे नेते भाजपच्या मुशीतून तयार झाले. भाजप (BJP) हीच त्यांची ओळख आहे. भाजपपासून ते दूर झाले की, त्यांची जनमानसातील ओळख पुसून जाईल. मात्र, भाजपमध्ये अन्य पक्ष वा ठिकाणांहून आलेले नेते तसे नाहीत. ते पक्षाच्या चौकटीत मोठे झालेले नाहीत. त्यांंची विचारसरणी पूर्वी वेगळी होती. भाजपची कार्यसंस्कृती त्यांना पूर्णपणे अवगत झालेली नाही. त्यामुळे असे हे प्रकार घडू लागले आहेत. चर्चेतून त्यांना समजावता येते. प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते सध्या हे काम करत आहेत.
ते म्हणाले, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे वक्तव्य प्रसार माध्यमांत ज्या पद्धतीने छापून आले, ते वाचून त्यांनी तसे म्हणायला नको होते, असे प्रथमदर्शनी मत बनले. त्यांच्याशी मी बोललो आहे.
सध्या सदस्यत्व मोहीम सुरू असल्याने ते जनतेशी संवाद साधत आहेत. त्यावेळी रोजगाराचा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातो. त्यावेळी त्यांनी, आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून नोकऱ्यांची निर्मिती दोन वर्षांत करून घेतो, अशी हमी दिली आहे. त्याबाबत त्यांनी मला माहिती दिली, ती समाधानकारक आहे. आपल्या वक्तव्याबाबत ते दिल्लीतील नेत्यांशीही बोलल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत पक्षात कोणताच गैरसमज आता राहिलेला नाही.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे मंगळवारी (ता.१) कार्यकर्त्यांच्या समस्या व प्रश्न ऐकून ते सोडविण्यासाठी भाजप कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. भाजपने दर मंगळवारी एक मंत्री पक्षाच्या पणजी कार्यालयात कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी, तर बुधवारी जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी मंत्रालयात उपस्थित असेल, असे ठरविले आहे. त्यानुसार राणे हे भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी उपस्थित राहतील, असे तानावडे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.