Govind Gaude: सभापती रमेश तवडकर आणि कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यात उफाळून आलेला वाद मिटविण्यासाठी भाजपने नेटाने प्रयत्न चालवले आहेत.
या दोन्ही नेत्यांनी त्या विषयावर यापुढे जाहीर वाच्यता करू नये, अशी तजवीज करण्यात तूर्त भाजपच्या स्थानिक नेत्यांना यश आल्याचे सांगण्यात येते.
खोतिगाव पंचायत क्षेत्रातील एका वाड्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजनासाठी 26 लाख रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले होते. ते कार्यक्रमच झाले नाहीत.
या संस्था म्हणजे, एकाच घरात दोन संस्था या प्रकारच्या आहेत, असा आरोप तवडकर यांनी केला होता. गावडे यांनी आपल्या मतदारसंघात लुडबूड चालवल्याचा आरोप तवडकरांनी केला होता.
गावडे यांचा हेतू तपासण्याची जाहीर मागणीही त्यांनी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बोलावून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
शिवाय पक्षीय पातळीवर हा विषय उपस्थित करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यांचा एकंदर आविर्भाव गावडे यांना धडा शिकवणारच, असा होता.
तवडकर आणि गावडे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आदिवासी समाजातील काही जणांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात ते एकत्र आले होते.
‘गोमन्तक’शी बोलताना त्यांनी ‘होय, आता वाद मिटले’ अशी कबुलीही दिली होती. असे असताना आता कला व संस्कृती खात्याच्या अनुदानाच्या रूपाने नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
दिल्लीश्वरांकडून दखल:-
सभापती या घटनात्मक पदावरील व्यक्तीने सरकारी कारभाराचा जाहीर पंचनामा, तोही विधानसभा अधिवेशन काळात केल्याने त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यामुळे दिल्लीतून सातत्याने हा नेमका प्रकार काय, याची विचारणा होऊ लागली आहे.
पंतप्रधान ६ रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वावटळ निर्माण होणे परवडणारे नाही, हे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ओळखले आहे.
त्यासाठी सकाळपासूनच हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या दोन्ही नेत्यांनी या वादाबाबत जाहीर भाष्य करू नये, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
आदिवासी समाज ताकद दाखवणार:-
हा वाद का उफाळला, याची कारणमीमांसा आदिवासी समाजाच्या नेत्यांकडूनही केली जात आहे. राजकीय आरक्षणासाठी समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे.
विधानसभेवर मोर्चा नेण्याचे नियोजन असताना समाजाच्या दोन नेत्यांमधील वाद वाढू नयेत, यासाठी या दोन्ही नेत्यांपर्यंत योग्य तो संदेश पोचवण्यात आला आहे.
हे नेते हट्टाला पेटले तर त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत समाजाची ताकद काय असते ते दाखवून देऊ, असेही समाजाचे नेते आता बोलू लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.