BJP Election Preparation 2027: गोव्यात 50 टक्क्यांहून अधिक मतांचे लक्ष्य! भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी नितीन नवीन यांचा कार्यकर्त्यांना 'बुस्ट'

Goa Assembly Election 2027: आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गोव्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना आक्रमकपणे मैदानात उतरण्याचे आवाहन केले.
Goa Assembly Election 2027
BJP Election Preparation 2027Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गोव्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना आक्रमकपणे मैदानात उतरण्याचे आवाहन केले. तसेच मित्रपक्षांशी युतीचा निर्णय दिल्लीत नव्हे, तर स्थानिक पातळीवरच घ्यावा, असेही नवीन यांनी गाभा समितीच्या सदस्यांसमोर स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ५२ टक्के मतांचा दाखला देत, आगामी विधानसभा निवडणुकीतही ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्याचे लक्ष्य त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवले. केवळ राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी नव्हे, तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येक निवडणूक जिंकणे आवश्यक असल्याचे नवीन यांनी स्पष्ट केले. भाजप मुख्यालयात आगमन झाल्यानंतर नवीन यांनी वृक्षारोपण केले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी राज्य कार्यकारिणीच्या हजारभर सदस्यांना संबोधित केले.

Goa Assembly Election 2027
Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी VIDEO

त्या बैठकीनंतर मंत्री आमदारांची बैठक व सायंकाळी उशिरा प्रदेश गाभा समितीच्या बैठकीत ते सहभागी झाले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व ठिकाणी त्यांनी ‘निवडणुकीला ११० दिवस राहिल्याने राज्य व केंद्र सरकारची कामगिरी घेऊन जनतेत जा’, असा संदेश दिला. भाजपच्या मुख्यालयात मंगळवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन यांनी पक्षाच्या निवडणूक तयारीला धार दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा प्रभारी डॉ. भारती पवार आणि शिवप्रकाश यांच्यासह पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

गोव्यात झालेला विकास आणि स्थिर सरकार हेच भाजपचे प्रमुख निवडणूक मुद्दे असतील, असा संदेश नवीन यांनी दिला. विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. विरोधकांकडून लोकशाहीला आव्हान देण्याचा आणि देशात अराजकता निर्माण करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी भाजपला राज्यात आणि देशात सत्तेवर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

११० दिवसांनी निवडणूक; विजय भाजपचाच!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन केले. गोवा विधानसभेची निवडणूक ११० दिवसांनी होणार असल्याचे सांगत, पुढील तीन महिने कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावे, असे ते म्हणाले.

मगो युतीसंदर्भात एका मंत्र्याने विचारला प्रश्‍न

मगोसोबतच्या युतीचा विषय गाभा समितीच्या बैठकीत चर्चेला आला. मगोच्या नेतृत्वाकडून काही मतदारसंघांची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका काय असेल अशी विचारणा गाभा समिती सदस्य असलेल्या एका मंत्र्याने केली. त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिल्लीत युतीविषयी निर्णय होणार नाही, प्रदेश नेतृत्वाला विश्वासात घेऊनच युती करायची झाल्यास निर्णय होईल, असे नमूद केले.

Goa Assembly Election 2027
Scrub Typhus Spread In Goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

मनोहर पर्रीकरांच्या कार्याचा गौरव

गोव्याच्या मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहताना त्यांनी गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळण्यास काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी साधेपणा आणि विकासाच्या माध्यमातून भाजपला वेगळी ओळख दिली, असे सांगत त्यांनी मनोहर पर्रीकरांच्या कार्याचा गौरव केला. भाजपमध्ये नि:स्वार्थी कार्यकर्त्यांना संधी मिळते, तर अन्य पक्षांमध्ये घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते, असा दावाही त्यांनी केला.

पार्सेकर, पर्रीकर फेरप्रवेश योग्यवेळी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर भाजपमध्ये फेरप्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्याबाबत दामू नाईक यांना विचारले असता ते म्हणाले, योग्य वेळी योग्य त्या गोष्टी होतील. तथापि, उत्पल यांनी आपण राज्याबाहेर असल्याचे स्पष्ट केले.

आज युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन बुधवारी युवा नेते आणि कार्यकर्त्यांना अटल भवन येथे सकाळी ९.४५ वाजता संबोधित करणार आहेत. दुपारी १२.३० वाजता ते दिल्लीला जाण्यासाठी रवाना होतील.

फातोर्डा, मांद्रे, कुंकळ्ळी, हळदोणे हे मतदारसंघही यापूर्वी भाजपकडे होते. ते जिंकत २०२७ मध्ये ३० जागा जिंकण्याचे लक्ष्‍य ठेवले आहे. त्याचा रोडमॅप दिवसभराच्या बैठकीतून तयार झाला आहे.

- दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com