
पणजी: सत्ताधारी भाजप आघाडीने विधानसभा कामकाजातील रणनीती ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीच्या ठिकाणी सभापती रमेश तवडकर पोहोचल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. विरोधकांच्या हातात तर त्यामुळे आयतेच कोलीत मिळाले आहे.
भाजपने गाभा समितीची बैठक काल सोमवारी पक्ष कार्यालयात घेतली. या बैठकीचा पाठपुरावा म्हणून येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक बोलावण्याचे कालच ठरविण्यात आले. त्यातच आज होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला काही विरोधी आमदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती भाजपला मिळाली.
विरोधकांच्या या फुटीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांची एकजूट प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार आज मंगळवारी येथील एका हॉटेलमध्ये सत्ताधारी आमदार व मंत्र्यांची बैठक घेण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होती असे स्पष्टपणे सांगितले असतानाही त्या बैठकीच्या ठिकाणी सभापती रमेश तवडकर पोहोचले. त्याबाबत विचारणा केल्यावर ‘आपण केवळ जेवणासाठी आलो होतो, बैठकीत सहभागी झालो नाही’ असा खुलासा केला. मात्र तोपर्यंत ते बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्याचे सार्वत्रिक झाले. त्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
दरम्यान, विधानसभा अधिवेशनात विरोधकांचे सर्व प्रयत्न निष्फळ करण्यासाठीची रणनीती सत्ताधारी गटाच्या बैठकीत आज ठरविण्यात आली. पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे.
त्यापूर्वी सत्ताधारी आघाडीतील आमदारांमध्ये समन्वय साधणे आणि रणनीती निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत बंद दाराआड बैठक पार पडली. विरोधकांकडून सरकारला लक्ष्य करण्यासाठी विधानसभेत अनेक मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
त्यास सडेतोड उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी आमदारांची भूमिका ठरवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. विधिमंडळातील भाजप गटासोबत मगोचे दोन आणि तीन अपक्ष आमदार असलेला सत्ताधारी आघाडी गट हे अधिवेशन सुसाट पार पाडण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
१. विधानसभा अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी आयोजित भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सभापती रमेश तवडकर सहभागी झाल्याचे वृत्त आल्यानंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच उघडपणे पक्षपाती पद्धतीने वागण्याचा आणि सभापती कार्यालयाच्या तटस्थतेशी तडजोड करण्याचा आरोप केला आहे.
२. विरोधकांना बोलू न देता अघोषित आणीबाणी लागू करण्याचा भाजपचा जो डाव आहे, त्यात सभापतीही सामील आहेत का? असा सवाल सरदेसाई यांनी केला. जेव्हा सभापती राजकीय हत्यार बनतात तेव्हा लोकशाहीचा खून होतो, असे ते म्हणाले.
३. काल जेव्हा सभापती भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतून बाहेर आले आणि त्यांना मंत्री होण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ‘बातम्या येतील’. आज ते भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले. यातून लोक काय निष्कर्ष काढतील? असा प्रश्नही सरदेसाई यांनी फातोर्डा येथे बोलताना उपस्थित केला.
सभापती रमेश तवडकर हे हॉटेलमधून बाहेर आल्यावर त्यांना बैठकीत काय झाले अशी विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, मी आज बैठक संपल्यानंतर पोहोचलो. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा एक कार्यक्रम काणकोणमध्ये होता. तो आटोपून मी आलो. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मी आलो होतो. बैठकीत काय झाले हे मला माहीत नाही. मात्र भोजनात सहभागी झालो.
या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अलीकडेच मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलेले आमदार गोविंद गावडे हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सत्ताधाऱ्यांतील एकसंधतेचा संदेश देण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून आला. बैठकीत विरोधकांच्या संभाव्य प्रश्नांची, आरोपांची व आंदोलनांची चर्चा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.