Kushagra Jain Case: ..माझ्या मुलग्याचा मृत्यू झालाच कसा? 'कुशाग्र'च्या वडिलांनी लिहिले CM सावंतांना पत्र; विषबाधेचा संशय व्यक्त

Bits Pilani student death: गोव्‍यातील सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये शिकणारा त्‍यांचा २१ वर्षीय मुलगा कुशाग्र याचा १६ ऑगस्ट रोजी आकस्‍मिक मृत्‍यू झाला होता.
Bits Pilani Goa Death
Bits Pilani GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: माझा मुलगा धडधाकट होता. त्याला कुठलाही आजार नव्हता आणि तो कसले औषधही घेत नव्हता. मग अकस्मात त्याची प्रकृती खालावून त्‍याचा मृत्यू कसा झाला? असा सवाल विनोद कुमार जैन यांनी केला आहे. बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत विद्यार्थी कुशाग्र जैन याचे ते वडील.

तसेच हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने सखोल चौकशी करावी अशी मागणी त्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. बिट्स पिलानी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू हा सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. विनोद कुमार जैन (६४) हे निवृत्त सरकारी नोकर आहेत.

गोव्‍यातील सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये शिकणारा त्‍यांचा २१ वर्षीय मुलगा कुशाग्र याचा १६ ऑगस्ट रोजी आकस्‍मिक मृत्‍यू झाला होता. मात्र त्‍याचा मृत्‍यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे शवचिकित्सा अहवालातही स्पष्ट झालेले नाही. त्याच्या रक्ताच्या नमुन्याची रेडॉक्स चाचणी केली असता ताप आल्यावर ज्या गोळ्या घेतात त्याचा अंश त्याच्या शरीरात सापडला होता.

‘त्‍या’ एका तासात नेमके काय घडले?

विनोद कुमार जैन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्‍हटले आहे की, १५ ऑगस्ट रोजी कुशाग्र रात्री साडेदहा वाजेपर्यंत आपल्या मित्राबरोबर टेबल टेनिस खेळत होता. त्यानंतर तो आपल्या हॉस्टेलच्या खोलीत गेला. १६ ऑगस्ट रोजी पहाटे २.१२ वाजेपर्यंत तो व्हॉट्स-ॲपवर ॲक्टिव्ह होता. शवचिकित्सा अहवालानुसार कुशाग्रचा मृत्‍यू पहाटे तीनच्या सुमारास झाला. त्या एका तासात असे काय झाले की कुशाग्रची प्रकृती अकस्मात का खालावली?

वडिलांनी व्‍यक्त केला विषबाधेचा संशय

बिट्स पिलानी कॅम्पसमधील व्यवस्थापनाकडे जैन यांनी हॉस्टेल कॉरिडॉरमधील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मागितले असता, तेसुद्धा त्यांना उपलब्ध करून दिले नाही. माझा मुलगा धडधाकट होता. त्याला कुठलाही आजार नव्हता. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद वाटत असून त्याच्यावर कुणी विषबाधा तर केली नाही ना? अशी शंका उपस्थित करून या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी करावी. तसेच पुरावे नष्ट केले जाऊ नयेत यासाठी ही चौकशी विनाविलंब करण्यात यावी अशी मागणी जैन यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे.

कुशाग्रचे ओठ आणि नखे पडली होती निळी

जैन यांनी आपल्या पत्रात नमूद केल्‍याप्रमाणे, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आपण बिट्स कॅम्पसमध्ये पोहोचलो त्यावेळी कुशाग्रचा मृतदेह त्याच्या खाटीवर होता. त्याचे ओठ आणि नखे निळी पडली होती. यासंदर्भात मी वास्कोचे उपअधीक्षक कदम यांच्याशी बोललो. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने तसे झाले असावे असे आपल्याला सांगण्यात आले.

Bits Pilani Goa Death
Bits Pilani: 9 महिन्यांत पाच मृत्यू का झाले? विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कसे दूर होणार?

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू

अवघ्या नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पस चर्चेत आला आहे. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांची नियुक्ती केली असून, त्‍यांनी आपले काम सुरू केले आहे.

मागच्या आठवड्यात या कॅम्पसमधील ऋषी नायर (२१) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी क्लिटस यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नेमली होती.

Bits Pilani Goa Death
Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

काल जिल्हाधिकाऱ्यांनी बिट्स पिलानी कॅम्पसला भेट देऊन या संस्थेच्या संचालकांशी व नंतर विद्यार्थी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, चौकशीसाठी विविध खात्यांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती असलेली वेगवेगळी पथके तयार करण्‍यात आली आहेत. ही पथके एक एक दिवस बिट्स पिलानी कॅम्पसला भेट देऊन स्वतंत्ररीत्या चौकशी करणार आहेत. त्यानंतर आपला अहवाल ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com