Bits Pilani: 9 महिन्यांत पाच मृत्यू का झाले? विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कसे दूर होणार?

Mental Stress: सध्या मानसिक तणावाचा जो अजगर युवा पिढीला गिळंकृत करायला निघाला आहे त्याचा बीमोड करण्याकरता पालकांनी व शिक्षकांनी हातात हात मिळून कार्य करण्याची गरज आहे.
BITS Pilani student deaths, mental stress in students
BITS Pilani student deaths, mental stress in studentsDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

बिट्स पिलानीच्या संकुलात गेल्या नऊ महिन्यांत एका मागोमाग एक पाच मृत्यू झाल्यामुळे केवळ गोवाच नव्हे तर सारा देश हादरला आहे. तसे होणेही साहजिकच आहे. अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणारे पाच विद्यार्थी एका मागोमाग एक या जगातून जातात ही खरोखर मन व्यथित करणारी गोष्ट आहे यात शंकाच नाही. पण हे मृत्यू का झाले याच्या मुळाशी कोणीही जाताना दिसत नाही. तसे कुणी या पूर्वीच गेले असते तर पहिला मृत्यू हा शेवटचा मृत्यू ठरला असता.

मानसिक तणाव हे या मृत्यूमागचे समान कारण असे सांगितले जात आहे. पण अगदी कोवळ्या वयात या युवकांना मानसिक तणाव का आला आणि आला तर त्याचे योग्य व्यवस्थापन का केले गेले नाही याचे उत्तर कोणीही शोधताना दिसत नाही.

लक्षात घ्या, बिट्स पिलानी ही एक देशातील नावाजलेली संस्था. यात प्रवेश मिळविण्याकरता जबरदस्त स्पर्धा असते. त्यामुळे या संस्थेत प्रवेश मिळालेले विद्यार्थी हे उच्च दर्जाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात.

केवळ त्यांच्या दृष्टीनेच नव्हे तर समाजाच्या, राष्ट्राच्या दृष्टीनेसुद्धा या विद्यार्थ्यांकडे ‘क्रीम ऑफ समाज’ म्हणून पाहिले जाते. साहजिकच त्यांचे भवितव्यही उज्ज्वल असते. अशा सगळ्या सकारात्मक बाबी पारड्यात असतानासुद्धा त्यांनी मानसिक तणावाखाली का जावे, याचे आकलन होत नाही.

केवळ या घटनांकडेच नव्हे तर आजच्या युवावर्गाकडे पाहिल्यास मानसिक तणाव, नैराश्य यांसारख्या नकारात्मक प्रवृत्तीने त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान पटकावले असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लढाऊ वृत्तीचा अभाव.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या घडत नसतात. पण अशा गोष्टींना तोंड देण्याची बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी नसते आणि त्यामुळेच मनाविरुद्ध घटना घडायला लागल्या, की हे युवक मग मानसिक दडपणाखाली जायला लागतात. बिट्स पिलानीमध्ये आता नुकत्याच मृत्यू पावलेल्या ऋषी नायरचेच उदाहरण घ्या.

त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केल्यामुळे तो मानसिक दबावाखाली होता, त्याच्यावर उपचार सुरू होते असे सांगितले जात आहे. आता त्याच्या प्रेयसीने आत्महत्या का केली, तिच्यावर ही वेळ का आली हा एक वेगळा विषय ठरू शकतो.

प्रेयसीच्या आत्महत्येमुळे दुःख होणे साहजिकच आहे हे मान्य केले तरी त्यामुळे प्रदीर्घ काळ मानसिक तणाव येणे, आपला कॅम्पस सोडून गोव्यात यावे लागणे या गोष्टी अनाकलनीय वाटतात. यातून विद्यार्थ्यातली विपरीत परिस्थितीशी लढण्याची प्रवृत्ती कमी व्हायला लागली आहे हे स्पष्ट होते.

आज पालकांना एक व दोन मुले असल्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा पुरविण्याकडे पालकांचा कल असतो. पैसाही मुबलक असल्यामुळे ते मागेल ती गोष्ट त्यांना पुरवली जाते. पूर्वी बऱ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मिळेल त्या गोष्टीवर, वस्तूंवर पाल्यांना समाधान मानावे लागत असे.

पण त्यातूनच या मुलांची लढाऊ वृत्ती बळावत जात असे. यामुळेच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक व्यक्ती तयार होऊ शकल्या. पण आता मुलांना भौतिक सुखे मिळत असल्यामुळे काही मनाविरुद्ध झाले की ते ‘रिॲक्ट’ व्हायला लागतात. आणि त्यातूनच मग काहीजण नैराश्य म्हणजे ‘डिप्रेशन’चे शिकार बनताना दिसतात.

म्हणूनच तर आज शैक्षणिक आस्थापनामध्ये समुपदेशकांची नियुक्ती करावी लागत आहे. आता हे समुपदेशक काय कार्य करतात, किती मुलांना योग्य मार्गावर आणतात हा वेगळा विषय ठरू शकेल.

आज ही जी समुपदेशकाची गरज निर्माण झाली आहे तीच मुळात चिंतेचा विषय आहे. आम्ही विद्यार्थी असताना ही गरज का निर्माण झाली नाही हाही प्रश्न यातून निर्माण व्हायला लागतो. आजचे अनेक विद्यार्थी मुळात मानसिक विकारांचे का बळी ठरत आहे हा सवालही उपस्थित होतो. खरे तर आईवडील हेच मुलाचे खरे समुपदेशक ठरू शकतात.

पण हे कार्य करायला आई-वडिलांकडे वेळच नसल्यामुळे ते हे कार्य अन्य घटकांकडे दिले जाते. आपल्या मुलांना पैसा पुरविला म्हणजे आपले कर्तव्य संपले असे अनेक पालकांना वाटत असते. मानसिक आरोग्य नावाचा काही प्रकार आहे याची जाण अनेक पालकांना नसतेच.

BITS Pilani student deaths, mental stress in students
Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

आपली मुले नेमके काय करतात याच्याशी अनभिज्ञ असलेले अनेक पालक सापडतील. त्यात परत मोबाइल, २४ तास आक्रमण करणारे टीव्हीचे विविध चॅनल्स हे युवा पिढीला आव्हान देत आहेत. या गोष्टींचा परिणाम लगेच दिसत नसला तरी ‘स्लो पॉइझनिंग’ प्रमाणे याचा परिणाम हळूहळू अधोरेखित व्हायला लागतो.

बिट्स पिलानीमधले गेल्या नऊ महिन्यातील मृत्यू हे याच परिणामाचा प्रत्यय देत आहेत. ही बाब फक्त बिट्स पिलानीपुरती मर्यादित नसून तिचा प्रसार आज अनेक ठिकाणी व्हायला लागला आहे. याकरता पालकांनी व शिक्षकांनी सतर्क होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

BITS Pilani student deaths, mental stress in students
BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

आई वडील व शिक्षक यांनी जर योग्य वेळी समुपदेशकाची भूमिका बजावली तर पाल्यांचे मानसिक आरोग्य शाबूत राहणे कठीण नाही. मात्र एकदा का वेळ गेली की मग हातपाय बडविण्यापलीकडे आपल्या हातात काहीच राहत नाही हेही तेवढेच खरे आहे. म्हणूनच टक्के टोणपे खाऊनच आयुष्य घडत असते हे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर बिंबवायला हवे. ‘कम वॉट मे’ ही स्पिरिट त्यांच्या मनात रुजवायला हवी.

मानसिक तणावाचे व्यवस्थापन करायलाही मुलांना लहानपणापासून शिकविले पाहिजे. सध्या मानसिक तणावाचा जो अजगर युवा पिढीला गिळंकृत करायला निघाला आहे त्याचा बीमोड करण्याकरता पालकांनी व शिक्षकांनी हातात हात मिळून कार्य करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आणि ही गरज पूर्ण करण्याचा निर्धार केला नाही तर बिट्स पिलानीसारख्या घटना मागच्या पानावरून पुढे चालूच राहतील हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com