BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

BITS Pilani Student Death: पाच मृत्‍यूंपैकी दोन विद्यार्थ्यांचे मृत्‍यू आत्‍महत्‍येमुळे झाले आहेत. एका महिन्‍यापूर्वी याच कॅम्‍पसमध्‍ये कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला होता.
BITS Pilani
BITS PilaniDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मागच्‍या दहा महिन्‍यांत सांकवाळ येथील बिट्‌स पिलानी कॅम्‍पसमध्‍ये एकूण ५ विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यापैकी तीन विद्यार्थ्यांचे मृत्‍यू विद्यार्थ्यांच्‍या स्‍वास्‍थविषयक गरजा व्‍यवस्‍थित न हाताळल्‍यामुळे झालेल्‍या आहेत. संपूर्ण भारतात बिट्‍सचे पाच कॅम्‍पस आहेत. अशा परिस्‍थितीत गोव्‍यातील कॅम्‍पसमध्‍येच हे मृत्‍यू का हाेतात असा प्रश्न आता पालक विचारू लागले आहेत.

या पाच मृत्‍यूंपैकी दोन विद्यार्थ्यांचे मृत्‍यू आत्‍महत्‍येमुळे झाले आहेत. एका महिन्‍यापूर्वी याच कॅम्‍पसमध्‍ये कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला होता. त्‍यावेळीही त्‍याच्‍या शारीरिक स्‍वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्‍यामुळे त्‍याला मृत्‍यू आल्‍याचे उघड झाले होते. मृत होण्‍यापूर्वी कुशाग्रने क्रोसिन गाेळ्‍यांचे सेवन केले होते ही बाब पुढे आली आहे.

या मृत्‍यू प्रकरणाची चौकशी सध्‍या दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समिती करत असून यासंदर्भात क्‍लिटस यांची प्रतिक्रिया विचारली असता, सध्‍या मृत पावलेल्‍या ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृत्‍यू कशामुळे झाला याची चौकशी करण्‍यापेक्षा या कॅम्‍पसमध्‍ये एवढ्या कमी कालावधीत पाच विद्यार्थ्यांचे मृत्‍यू कसे झाले याची कारणे शोधण्‍याचा आम्‍ही प्रयत्‍न करणार आहे, असे त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, एवढ्या कमी काळात जर पाच विद्यार्थ्यांचे मृत्‍यू होत असतील, तर या शिक्षण संस्‍थेत मानसिक आरोग्‍याविषयी गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत अशा निकर्षापर्यंत कुणीही सहज पोहोचू शकेल, अशी प्रतिक्रिया चिखली वास्‍को येथील मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. शिल्‍पा पंड्या यांनी व्‍यक्‍त केली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी बिट्‍स प्रकल्‍पापैकी सर्वांत कडक शिस्‍तीचा प्रकल्‍प म्‍हणून गोव्‍यातील कॅम्‍पसकडे पाहिले जात होते. त्‍यामुळे गोव्‍यातील कॅम्‍पसमध्‍ये प्रवेश घेण्‍यास कुणी तयार नसायचे. यामुळे कॅम्‍पसमध्‍ये विद्यार्थी कमी होऊ लागल्‍याने बिट्‍सने गोव्‍यातील कॅम्‍पसच्‍या शिस्‍तीत थोडी लवचिकता आणली. त्‍यामुळे या कॅम्‍पसमध्‍ये विद्यार्थ्यांची संख्‍या वाढली. मात्र, त्‍याचे परिणाम आता दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया आता व्‍यक्‍त होऊ लागल्‍या आहेत. त्‍यामुळेच या पाचही मृत्‍यूची सखोल चौकशी व्‍हावी ही मागणी वाढू लागली आहे.

‘त्‍याला’ पालकांबरोबर का राहू दिले नाही?’

दरम्‍यान, एका महिन्‍यापूर्वी या कॅम्‍पसमध्‍ये मृत पावलेला विद्यार्थी कुशाग्र जैन याचे वडील नवीनकुमार जैन यांनी या नव्‍या मृत्‍यूबद्दल आपली प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, जर ऋषी नायर हा मानसिक तणावाखाली होता आणि त्‍याचे पालक गोव्‍यातच वास्‍तव्य करून होते, तर त्‍याला बिट्‍सच्या हॉस्‍टेलमध्‍ये एकटा रहाण्‍याची सक्‍ती का केली. त्‍याला त्‍याच्‍या पालकांबरोबर का राहू दिले नाही असा सवाल केला आहे.

आजाराची माहिती नव्हती, हळर्णकर

बिट्‍स गोवाचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन हळर्णकर यांनी खुलासा करताना, हा विद्यार्थी आजारी होता याची कल्‍पना आम्‍हाला कुणीच दिली नव्‍हती. या विद्यार्थ्याचे पालक गोव्‍यात राहतात हेही आम्‍हाला कुणी सांगितले नव्‍हते. त्‍याच्‍या पालकांनी आम्‍हाला हैदराबादचा पत्ता दिला होता. ते गोव्‍यात राहतात हे आम्‍हाला या दुर्घटनेनंतरच कळले, असे सांगितले.

रक्‍ताची रँडॉक्‍स चाचणी करणार

या विद्यार्थ्याचा मृत्‍यू झोपेत असताना उलटी केल्‍याने गुदमरून झाला असा प्राथमिक अंदाज शवचिकित्‍सा अहवालात नाेंद केला असला तरी, त्याचे नेमके कारण अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. हे कळण्‍यासाठी त्‍याचा व्‍हिसेरा राखून ठेवला आहे. या विद्यार्थ्याच्‍या रक्‍ताचे नमुने रँडॉक्‍स चाचणी करण्‍यासाठी गोमेकॉत पाठविणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी दिली.

मानसोपचार विभाग संशयाच्‍या घेऱ्यात!

मैत्रिणीच्‍या आत्‍महत्‍येमुळे तणावाखाली गेलेला बिट्स पिलानीतील २० वर्षीय विद्यार्थी ऋषी नायर हा पूर्णत: तणावाखाली होता. त्‍याला त्‍यातून सावरण्‍यासाठी त्‍याच्‍या आई-वडिलांनी गोव्‍यातच फ्‍लॅट घेतला होता. ऋषीला त्‍यांनी तणावातून बाहेर काढण्‍यासाठी औषधेही सुरू केली होती. याची माहिती बिट्स पिलानीच्‍या मानसोपचार विभागाच्‍या अधिकारिणीला दिली होती.

तरीही या विभागाने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्‍याची तक्रार ऋषीच्‍या आई–वडिलांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिस आणि आरोग्‍य अधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे या प्रकरणात बिट्स पिलानीचा मानसोपचार विभागच संशयाच्‍या घेऱ्यात सापडला आहे.

गोव्‍यातील अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या प्रसिद्ध अशा बिट्स पिलानी महाविद्यालयात गेल्‍या ९ महिन्यांत तब्बल पाच विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाला आहे. यातील दोन विद्यार्थ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍याचे, तर तीन विद्यार्थ्यांचा मृत्‍यू स्‍वत:च्‍या आरोग्‍याची हेळसांड केल्‍यामुळे झाल्‍याचे तपासाअंती समोर आले आहे.

याआधी झालेल्‍या चार विद्यार्थ्यांच्‍या मृत्‍यू प्रकरणांचा तपास बिट्स पिलानीने स्‍थापन केलेल्‍या समितीकडून सुरू असतानाच तीन दिवसांपूर्वी ऋषी नायर या २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीमध्ये आढळून आला. दक्षिण गोवा पोलिसांकडून सध्‍या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, त्‍यातून अनेक गोष्‍टी समोर येत आहेत.

दरम्‍यान, ऋषीच्‍या मैत्रिनीने जून महिन्यामध्‍ये आत्‍महत्‍या केली होती. तेव्‍हापासून तो पूर्णपणे मानसिक दबावाखाली होता. त्‍याच्‍या अभ्‍यासावर परिणाम होऊ नये, यासाठी त्‍याचे आई–वडील गोव्‍यातच फ्‍लॅट घेऊन राहत होते.

ऋषीला मानसिक तणावातून बाहेर काढण्‍यासाठी त्‍यांनी त्‍याच्‍यावर खासगी डॉक्‍टरकडून उपचारही सुरू केले होते. याची माहिती त्‍याच्‍या आई-वडिलांनी बिट्स पिलानीच्‍या मानसोपचार विभागालाही दिली होती. परंतु, या विभागाकडून आम्‍हाला योग्‍य प्रतिसाद मिळाला नाही, असे त्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करीत असलेल्‍या अधिकाऱ्यांना दिली असल्‍याची माहिती सरकारी सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची सखोल चौकशी व्हावी

‘बिट्स पिलानी कॅम्पस’मधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणात केवळ आत्महत्या म्हणून त्या दुर्लक्षित केल्या जाऊ नयेत. त्या मृत्यूंची सखोल चौकशी व्हावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्थांत समित्यांची स्थापना व्हावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा शाखेकडून करण्यात आली.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आपच्या युवा शाखेचे अध्यक्ष रोहन नाईक, नॅश कुतिन्हो व शिवा नाईक यांनी बिट्‍स पिलानी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी केली.

रोहन नाईक यांनी सांगितले की, गेल्यावर्षी डिसेंबरपासून आत्तापर्यंत बिटस पिलानी कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व मार्गदर्शनासाठी समिती स्थापण्याच्या दिलेल्या निर्देशाचे पालन राज्यात अजूनही करण्यात आलेले नाही.

पाच विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाकडे केवळ आत्महत्या म्हणून दुर्लक्ष केले जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागील इतरही कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. त्यासाठी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नाईक यांनी केली.

BITS Pilani
BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

बिट््सच्या कॅम्पसबाहेर युवा काँग्रेसची निदर्शने

बिटस् पिलानी गोवा कॅम्पसमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गोवा प्रदेश युवा काँग्रेस तसेच नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी बिटस् पिलानी कॅम्पसच्या बाहेर मेणबत्ती मिरवणूक काढून निदर्शने केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांची सखोल आणि पारदर्शी चौकशी करून सत्य उघड करण्याची मागणी सरकार व बिटस् पिलानी व्यवस्थापनाकडे केली.

बिट्‍स पिलानी कॅम्पसच्या बाहेरील परिसरात मादक पदार्थांची रेलचेल असल्याचे उघडकीस आलेले असून हा अमलीपदार्थ बिट्‍स पिलानी कॅम्पसमध्येही पोहोचत असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

BITS Pilani
BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

बिट्‍स पिलानी कॅम्पसचे सुरक्षा ऑडिटही व्हायला हवे. वारंवार घडणाऱ्या मृत्यूमुळे हा कैम्पस विद्यार्थ्यांसाठी सुरक्षीत नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. या घटनांना शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन आणि सरकार दोन्ही जबाबदार असून एवढे मृत्यू होऊनही गंभीर दखल घेण्यात आलेली नाही असा आरोपही युवा काँग्रेसने केला आहे. स्थानिक आमदार अँथनी वाझ यांनीही कृतिशील व्हावे, अशी मागणी केली.

यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाहर यांनी यापुढे अन्य कुणा विद्यार्थ्यांचा अशाप्रकारे मृत्यू होऊ नये यासाठी आत्तापर्यंत घडलेल्या प्रकरणांची सखोल आणि पारदर्शी चौकशी होण्याची आवश्यकता व्यक्त केली. सत्य काय आहे हे सरकार आणि शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने समोर आणायला हवे, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com