Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

Bioluminescent Trees Goa: सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून ही भ्रमंती सुरू झाली होती. जंगल घनदाट म्हणावे असे नसले तरी 'किर्र बोलते घन-वनराई' असे वातावरण सभोवार निश्चितच होते.
Bioluminescent trees in Sattari Goa
Bioluminescent trees in Sattari GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Western Ghats Jungle Mystery:एका नेहमीच्या, मळलेल्या पाऊलवाटेवरून पश्चिम घाटातील जंगलाच्या भागात शिरताना वाटेवर जी जिवंत आश्चर्ये भेटतात त्यांचा विचार केल्यास, अस्पर्शीत खोल आणि खऱ्याखुऱ्या दाट जंगलात काय काय अद्भुत मांडलेले असेल याची कल्पना देखील करता येणार नाही.

सत्तरी तालुक्यातील विवेकानंद पर्यावरण जागृती ब्रिगेड (Vivekanand environment awareness brigade- VEAB)ने सूर्यास्तानंतरच्या काळोखात आयोजित केलेल्या सुमारे एक-दीड किलोमीटर अंतराच्या पायी भ्रमंतीत, जंगलातील अनोळखी जीवांचे जे विश्व, त्यात सहभागी झालेल्यांसमोर साकार होत होते ते त्या सर्वांना अचंबित करणारे होते. 

या भ्रमंतीचा सर्वात प्रथम उद्देश होता रात्रीच्या काळोखात चमकणाऱ्या झाडांचे तेज अनुभवण्याचा. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून ही भ्रमंती सुरू झाली होती. जंगल घनदाट म्हणावे असे नसले तरी 'किर्र बोलते घन-वनराई' असे वातावरण सभोवार निश्चितच होते.

प्रत्येकाच्या हातात टॉर्च होते. अर्थात या भ्रमंतीत सहभागी झालेल्यांच्या हातातील टॉर्च त्यांच्या पावलांखालील वाटांना उजळवत चालले होते तर विवेकानंद पर्यावरण जागृती ब्रिगेडच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या हातातील टॉर्चचा प्रकाश मात्र वाटेच्या दोन्ही बाजूंला असलेल्या झाडांच्या बुंध्यांवर, त्यांच्या पानांवर, बाजूच्या दगडी खाचामध्ये सराईत शोधक नजरेने फिरत होता. 

आणि या भ्रमंतीत मार्गदर्शकांनी कितीतरी जीवांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. बोटाच्या नखाइतक्या आकाराच्या जीवापासून ते हातभर लांबीच्या जिवाण्यांपर्यंतची वाटेवरची जैवसंपदा मार्गदर्शकांच्या नजरेच्या टप्प्यात निमंत्रण दिल्यासारखे सहज कशी येते हा आणखीन एक आश्चर्यकारक प्रश्नही साऱ्यांच्या मनात येत होता.

Bioluminescent trees in Sattari Goa
Velage Surla: मँगनीजचा शोध पोर्तुगीज काळातच लागला, गोवा स्वतंत्र झाला; विकासाच्या नावाखाली डोंगर खणले, शेतीसंस्कृती विसरले

साचलेल्या पाण्यातील टॅडपोल‌ ते वेगवेगळे इवलाले बेडूक, पानांआड लपलेले सडसडीत साप, बुंध्यांच्या खळगीतले खेकडे, फांद्यांवर झोपलेली चिमूटभर आकाराची फुलपांखरे,  मलबार ग्लायडिंग फ्रॉग, बोटभर लांबीचे विंचू या जीवसृष्टीचे होणारे दर्शन हे सारे या वाटांवरचा बोनस होते. पण हा बोनस देखील डोळ्यांना विस्फारित करत होता. 

आणि मग शेवटी ती जागा आली ज्यासाठी या छोटीशा भ्रमंतीत सारे जण आपले पाय तुडवत होते.‌ काळोखात चमकणारे झाड! या जागेवर आल्यानंतर सारे टॉर्च विझवले गेले. कृत्रिम प्रकाश हटला आणि काळोख अचानक तुडुंब झाला.

Bioluminescent trees in Sattari Goa
Mhadei Wildlife: देवराईचं जंगल, पाण्याचे झरे आणि हजारो वर्षांचा वारसा 'म्हादईची देवराई', निसर्गसंपन्नतेचं देवतांकडून दिलेलं देणं

डोळे हळूहळू जसे अंधाराला सरावू लागले तसतसे ते हात-दोन हात जाडीच्या झाडाचा बुंधा एका हाताच्या अंतरावर उजळताना दिसू लागला. मंद ज्योतीसारखे तेवणारे ते झाड साक्षात कितीतरी वेळ समोर होते. त्या‌ सबंध वेळात रानातील काळोखही जाणवला नाही. 

रानातील पशुपक्षी गच्च काळोखात या प्रकाशाच्या वाटेवरून कितीतरी ये-जा करत असतील. त्यांच्या वाटांसाठीच निसर्गाने या खुणा निर्माण केल्या असतील काय?  परतायची वेळ झाल्यानंतर पुन्हा प्रत्येकाच्या हातातील टॉर्च पेटायला लागले आणि त्या प्रकाशात मघाशी काळोखात उजळलेल्या झाडाने आपले अंग पुन्हा चोरून घेतले. टॉर्चच्या प्रकाशात सारे जण पुन्हा परतीच्या मार्गाला लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com