Bicholim School डिचोली येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या वर्गातील 12 विद्यार्थिनींना आज दुपारी 12 च्या सुमारास अचानक श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ डिचोली आरोग्य केंद्रात दाखल केले.
बाधा कशामुळे झाली? कारण गुलदस्त्यात..!
वर्ग सुरू असताना अन्य विद्यार्थ्यांना त्रास न होता, अकरावीच्या वर्गातील फक्त १२ विद्यार्थिनींनाच श्वसनाचा त्रास झाला. त्यामुळे गुंता निर्माण झाला असून, यामागचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.
''पेपर स्प्रे'' मारल्याने की अन्य कोणत्या तरी उग्र पदार्थाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना बाधा पोचली, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
मात्र आठ दिवसांपूर्वी तीन विद्यार्थिनींवर ''पेपर स्प्रे'' मारण्याची घटना घडली होती. या प्रकरणात एका विद्यार्थ्याला एका आठवड्यासाठी शाळेत येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे आजची ही घटना ''पेपर स्प्रे'' मारल्यानेच घडली असावी, असा संशय आहे.
चौघांवर कारवाई अटळ
या प्रकाराची शाळा व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात चार विद्यार्थ्यांची नावेही पुढे आली आहेत. या विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत उद्या (शुक्रवारी) निर्णय होणार आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात येते, की काही दिवसांसाठी शाळेत येण्यास बंदी घातली जाते, त्याबाबत शाळा व्यवस्थापन निर्णय घेणार आहे.
यापूर्वीही घडला प्रकार
आठ दिवसांपूर्वीच याच विद्यालयात असाच प्रकार घडला होता. तेव्हा दोन मुलींना त्रास झाला होता. तपासणीवेळी काहीजणांच्या सॅकमध्ये ई-सिगारेट सापडल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर एका विद्यार्थ्याला काही दिवस शाळेत येऊ नये, असे बजावले होते. बुधवारपासून तो विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागला होता. परंतु तो आज वर्गात हजर नव्हता.
जिल्हा इस्पितळातून आठ विद्यार्थिनींना डिस्चार्ज :
म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात डिचोलीतील १० विद्यार्थिनींना उपचारासाठी दुपारी दाखल केले होते. यापैकी आठ विद्यार्थिनींना सायंकाळी डिस्चार्ज दिला असून अन्य दोन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या विद्यार्थिनी काहीशा घाबरल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. दोन विद्यार्थिनी डिचोलीतील आरोग्य केंद्रात उपचार घेत असल्याचे शाळेच्या सूत्रांनी सांगितले.
आणि एकाएकी घबराट
१ शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेच्या अकरावी ‘अ’च्या वर्गात हा प्रकार घडला. वर्ग सुरू असताना अचानक विद्यार्थिनींना चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे शिक्षकही प्रारंभी गोंधळून गेले.
२ बाधा झालेल्या १२ विद्यार्थिनींना डिचोलीच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, शुद्ध हरपल्याने दहाजणींना म्हापसा येथे जिल्हा इस्पितळात हलविले. उपचार झाल्यानंतर 8 विद्यार्थिनींना घरी पाठवल्याचे सांगण्यात आले.
स्प्रेचा मारा कोठून झाला?
या घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी वर्गात तपास केला असता संशयास्पद असे काहीच हाती लागले नाही.
‘पेपर स्प्रे’ फवारल्याने हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.
परंतु, स्प्रेचा मारा वर्गातून झाला की बाहेरून, याचा खुलासा होऊ शकला नाही.
हे कृत्य शाळेतीलच विद्यार्थ्यांनी केल्याचा संशय आहे.
याप्रकरणी शाळेचे व्यवस्थापन मंडळ कोणती कारवाई करणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आमदारांची घटनास्थळी धाव
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी म्हापसा येथे जिल्हा इस्पितळात धाव घेऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची चौकशी केली. एका नावाजलेल्या विद्यालयात असा प्रकार घडल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. असे प्रकार रोखण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने कडक पावले उचलावीत, असेही ते म्हणाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.