Tillari Water Pipeline: तिळारी धरण प्रकल्पाअंतर्गतच्या जलवाहिनीला डिचोलीत मोठी गळती लागली असून, दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जवळपास महिनाभर हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कातरवाडा-धबधबा परिसरात जलवाहिनीला ही गळती लागली आहे. या जलवाहिनीतून पाणी घसघसून वाहून जात असून नंतर ते जलवाहिनीच्या खालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात मिसळत आहे.
आतापर्यंत हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. जेथून पाणी वाहून जात आहे, तेथे जलवाहिनी उंचावर आहे.
त्यामुळे पाण्याचा दाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी मुद्दामहून बाहेर सोडण्यात आले आहे की जलवाहिनीला भगदाड पडले आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही. तरीसुद्धा घसघसणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहता जलवाहिनीत बिघाड झाल्याची शक्यताच अधिक आहे.
तिळारीतील पाणी कालव्याद्वारे डिचोलीतील वाठादेव-सर्वणपर्यंत पोचले आहे. वाठादेव येथून पुढे नार्वे गावापर्यंत कालव्याला जोडून मोठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी कातरवाडा-धबधबा येथून वाहणाऱ्या नदीवरून जाते.
कातरवाडा येथे नदीवरच या जलवाहिनीतून पाणी वाहून जात आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचा भास होतो. याबाबत जलस्रोत खात्याशी संपर्क साधला असता हा प्रकल्प तिळारी पाटबंधारे खात्याचा असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांमध्ये निर्माण झालाय संभ्रम:-
या जलवाहिनीतून घसघसून पाणी बाहेर फुटत आहे. ते नेमके कोणत्या कारणामुळे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जलवाहिनीला भगदाड पडल्यामुळे की अन्य कारणामुळे पाणी वाहून जात आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
ही जलवाहिनी नदीवरून गेल्याने तिची स्थितीही लक्षात येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे.
कारण काहीही असो, सध्या मात्र या जलवाहिनीतून पाणी वाया जात आहे, असे राजू मांद्रेकर या स्थानिक नागरिकाने सांगून पाण्याचा हा अपयव्य टाळावा अशी मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.