फोंडा : जोरदार पावसामुळे (Heavy Rain in Goa) दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या फोंड्यातील (Phonda) पुरातन साफा मशिदीच्या (Safa Masjid) तलावाच्या भिंतीची पाहणी शनिवारी उपमुख्यमंत्री (Deputy CM) तथा पुरातत्त्व खात्याचा ताबा असलेल्या बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांनी केली. सध्या कोसळलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती सुरू आहे. उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी कामाचा आढावा घेतला. सध्या तात्पुरते बांधकाम सुरू असून, पाऊस ओसरल्यानंतर पक्के बांधकाम करण्यात येईल, असे कवळेकर यांनी सांगितले. यावेळी पुरातत्त्व खात्याचे अधिकारी तसेच या मशिदीचे अध्यक्ष मूर्तझा मुल्ला व फोंडा दर्गा समितीचे अध्यक्ष अब्बास मुल्ला व इतर उपस्थित होते. सोळाव्या शतकातील ही साफा मशीद एकप्रकारे फोंड्याचा वारसा आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे या मशिदीचा ताबा आहे. या मशिदीसंबंधी कोणतेही बांधकाम करायचे झाले तर या खात्याची परवानगी घ्यावी लागते. तरीपण ऐनवेळेला धोका पोचू नये यासाठी बाबू कवळेकर यांनी संबंधितांशी संपर्क साधून त्वरित उपाययोजना केली, त्यामुळे मुस्लीम बांधवांनी त्यांचे आभार मानले.
फोंड्याचे पालकमंत्री गोविंद गावडे यांनीही साफा मशिदीला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात मशिदीला आणखी धोका पोचू नये यासाठी त्यांनी आवश्यक सूचनाही केल्या. प्राचीन आणि पुरातन वारसा जपण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, लोकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे गावडे यांनी सांगितले. यापूर्वी मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर यांचे पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते मिथिल ढवळीकर तसेच स्थानिक बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक यांनीही मशीद परिसराची पाहणी केली होती. या मशिदीच्या दुरुस्तीसंबंधी आमदार सुदिन ढवळीकर यांनी अगोदरच केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याला पत्रही दिले आहे. दरम्यान, मशिदीशी संबंधित समितीने उपमुख्यमंत्री कवळेकर व पालकमंत्री गावडे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यांचाही विचार केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.