

पणजी: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (14 जानेवारी) आक्रमक दिसले. वाढत्या गुन्हेगारीवरुन विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आकडेवारीनिशी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. गोव्याचा गुन्हे शोध दर (Crime Detection Rate) 86 टक्के असून तो देशात सर्वाधिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. "राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सरकारकडे नेमका काय आराखडा आहे?" असा रोखठोक सवाल युरी आलेमाव यांनी विचारला. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या राज्यात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचेही त्यांनी नमूद केले.
आलेमाव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा पोलिसांच्या (Goa Police) कामगिरीचे कौतुक केले. मुख्यमंत्री म्हणाले की, "गोव्यातील पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क असून कोणताही गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या आत पोलीस घटनास्थळी पोहोचतात. एवढ्या वेगाने प्रतिसाद देणारी यंत्रणा इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात अधिक प्रभावी आहे."
मुख्यमंत्र्यांनी पुढे माहिती दिली की, गोव्याचा क्राईम डिटेक्शन रेट 86 टक्के इतका आहे, जो संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकावर आहे. याचा अर्थ राज्यात घडणाऱ्या 100 गुन्ह्यांपैकी 86 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात वाढणाऱ्या स्थलांतराचा (Migration) मुद्दाही यावेळी चर्चेत आला. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, वाढत्या स्थलांतराकडे आमचे लक्ष असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभर 'भाडेकरु पडताळणी' (Tenant Verification) मोहीम कडकपणे राबवण्यात येत आहे. घरमालकांनी आपल्या भाडेकरुंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले असून यामुळे संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवणे सोपे जात आहे.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यातील या संवादामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण राहिले. विरोधकांनी सद्यस्थितीतील काही गुन्ह्यांचा दाखला दिला, तर सत्ताधारी पक्षाने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि वाढवलेली गस्त यावर भर दिला. एकंदरीत गुन्हेगारीमुक्त गोव्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.