Goa Assembly Monsoon Session 2023 Day 13: अधिवेशनातील तेराव्या दिवसाच्या ठळक घडामोडी, एका क्लिकवर

मागण्या आणि कपात सत्र
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 13 live updates
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 13 live updatesDainik Gomantak

कोणत्याही कंत्राटदाराचा मी गॉडफादर नाही - बांधकाम मंत्री काब्राल

मागण्या आणि कपात सत्रात उपस्थित केलेल्या प्रश्नांना बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. यावेळी कंत्राटदारांना दिलेली कामे त्यांनी योग्य पद्धतीने आणि लोकांचे हित लक्षात घेऊन करणे अपेक्षित आहे. मी कोणत्याही कंत्राटदाराचा गॉडफादर नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात असणार तीन प्रकारचे टँकर

राज्यात तीन प्रकारचे टँकर असतील अशी ग्वाही मंत्री काब्राल यांनी दिली.

बांधकाम खाते, पर्यावरण आणि कायदा ; आमदारांकडून विविध मागण्यांवर चर्चा

रोजगार देताना पैसे घेऊ नका - सरदेसाईंचा काब्राल यांना सल्ला

रोजगार देताना कोणाकडून पैसे घेऊ नका असा सल्ला आमदार सरदेसाई यांनी मंत्री काब्राल यांना दिला. पैसे घेतल्यास तुम्हाला शाप लागेल असेही सरदेसाई म्हणाले.

UCC वरून क्रुझ सिल्वा यांनी व्यक्त केली वेगळी चिंता

देशात सध्या समान नागरी कायदा लागू होण्याबाबत हालचाली सुरू आहेत, लोकसभेत UCC बिल मांडले जाणार आहे अशी चर्चा आहे. गोव्यात पहिल्यापासून समान नागरी कायदा लागू आहे. पण, सोशल मिडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर लक्ष घालावे अशी मागणी क्रुझ सिल्वा यांनी केली.

तुम्ही कसले हिंदू? तुम्ही देवळांचा आदर राखू शकत नाही; विजय सरदेसाई यांची टीका

विजय सरदेसाई म्हणाले, भोमाबाबत मंत्र्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नाही. सातेरी येथे महादेवाचे स्वयंभू देउळ आहे. तिथे रस्ता मंदिराला येऊन टेकवला आहे. ३०० वर्षांपुर्वीचे मंदिर आहे. तुम्ही स्वतःला हिंदू हिंदू म्हणवून घेता. तुम्ही कसले हिंदू? तुम्ही देवळांचा आदर ठेऊ शकत नाही. हा मंदिराचा विषय गंभीर आहे. शाप लागतील.

त्यावर मंत्री काब्राल यांनी सरदेसाई हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

माझे नाव घेऊ नका, कोर्टाचा निर्णय मला मान्य असेल ः मंत्री सुदिन ढवळीकर

विजय सरदेसाई म्हणाले, या जमिन खरेदीची दक्षता खात्यातर्फे चौकशी करणार की नाही हे कायदा मंत्र्यांनी सांगावे. हे प्रकरण सार्वजनिक हिताचे कसे असू शकते? हा शुद्ध वैयक्तिक फायदा आहे. ६ लाख चौरसमीटर जमिन संपादन झाली. त्यावर डब्ल्यूआरडी मंत्री म्हणतात ही जमिन कामाची नव्हती. हा सभागृहाची खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे. ते वरिष्ठ सदस्य आहेत. आपण काय प्रॉपर्टी खरेदी करतोय, याची त्यांना माहिती नाही? हा मॅटर जर कोर्टात असेल तर सभागृहात कसा उपस्थित झाला? हे मॅच फिक्सिंग आहे.

त्यावर मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांनी ठराव मागे घ्यावा. सरदेसाईंनी शब्द मागे घ्यावेत. मी प्रॉपर्टी घेतलेली नाही. ही प्रॉपर्टी ज्यांनी घेतली त्यांनी सांगितले. मला यात अजिबात रस नाही. हे प्रकरण कोर्टात आहे. तुम्ही माझे नाव घेऊ शकत नाही. कोर्ट जो काही निर्णय घेईल तो मला मान्य आहे.

मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मुलानेही जमिन खरेदी केली, प्रकरण कोर्टात मिटविण्याऐवजी सभागृहात मिटवण्याचा प्रयत्न - विजय सरदेसाई

आमदार आलेक्स सिक्वेरा म्हणाले की, ५ जुलै २०२३ च्या हायकोर्टाच्या आदेशानुसार हाऊसिंग बोर्डने सर्व्हेनंबर १४६/ १९ मध्ये जमिन संपादन केलेले नाही. त्यामुळे या जागेच्या मालकाविरोधात दाखल केलेल्या केसेस हाऊसिंग बोर्डने तत्काळ मागे घ्याव्यात.

आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, ८ तारखेला या प्रकरणाची कोर्टात सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच कोर्टात प्रकरण निकाली काढण्याऐवजी सभागृहात हे प्रकरण निकाली काढण्याचा मंत्री सुदिन ढवळीकर यांचा प्रयत्न आहे. २० हजार चौरस मीटर इतकी ही जमिन आहे.

मला हे सांगायला वाईट वाटते ज्यांनी जमिनी घेतल्या त्यांत मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मुलाचे नाव आहे. हे काय चालले आहे? हे सार्वजनिक हित आहे की वैयक्तिक हित? ही मॅचफिक्सिंग सुरू आहे. सभापती महोदय याची दक्षता खात्याकडून चौकशी करण्याची गरज आहे.

मंत्री हे आमदारांना कॉलिंग अटेंशनद्वारे सभागृहात मुद्दा उपस्थित करायला सांगतात. कारण त्यांना हे प्रकरण सभागृहातच मिटवायचे आहे. कायदा मंत्र्यांनी यावर उत्तर द्यावे.

त्यावर आलेक्स सिक्वेरा यांनी ही जागा २००५ मध्ये खरेदी केली गेली होती. माझा यात काहीही स्वार्थ नाही, किंवा मंत्र्यांनी मला हा मुद्दा उपस्थित करायला सांगितलेला नाही, असे स्पष्टीकरण दिले.

बर्लिनमध्ये १९ पदके जिंकणाऱ्या विशेष खेळाडुंना गणेश चतुर्थीपुर्वी रोख बक्षिस देणार - क्रीडा मंत्री गोविंद गावडे  

विरोधी पक्षनेते विजय युरी आलेमाव म्हणाले, बर्लिनमधील स्पर्धेसाठी गोव्याचे जे विशेष खेळाडु जिंकले होते. त्यांनी १९ पदके जिंकली. या खेळाडुंसाठी काय केले गेले, त्यांना खेळाबाबत पूर्ण सहकार्य केले जाणार आहे का? त्यांना काहीही उपकरणे दिली गेलेली नाहीत. त्यांना प्रोत्साहन कसे देणार? त्यासाठी नियमांपलीकडे विचार करावा लागेल.

त्यावर उत्तर देताना क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, ज्या क्रीडा संघटना गोवा स्पोर्ट्स अथॉरिटीकडे नोंद आहेत, त्यांनाच अनुदान दिले जाते. आजपर्यंत विशेष खेळाडुंची असोसिएशनच बनलेली नाही. मी सर्वांसोबत मीटिंग घेऊन त्यांना पाठबळ दिले आहे.

त्यांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. आम्ही मंजुरी देऊ, असे सांगितले आहे. नियमाच्या बाहेर जाऊन २०१९ पासून ज्यांनी पदके मिळवली त्यांना पूर्ण सहकार्य केले आहे. आत्ता जे १९ खेळाडुंनी पदके मिळवली त्यांना रोख बक्षिस गणेश चतुर्थीपुर्वी दिले जाईल.

बोंडला प्राणी संग्रहालयासाठी १५० कोटींची गरज

बोंडला प्राणी संग्रहालयाचा मास्टरप्लॅन मंजूर करण्यात आला आहे. त्याचा दर्जा सुधारण्यासाठी १५० कोटींची गरज आहे. टप्प्याटप्प्याने ही कामे होतील. दरवर्षी बोंडला अभयारण्याला ८० हजारहून अधिक पर्यटक भेट देतात, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

विश्वजीत राणे हे अनिल कपूर... आज एका दिवसाचे मुख्यमंत्री बनले; विजय सरदेसाईंचा खोचक टोला

वनमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सर्वकाही आलबेल नाही, राणे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी होत असते. आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री उपस्थित नव्हते.

ते पाहून आमदार विजय सरदेसाई यांनी विश्वजीत राणेंना खोचक टोला लगावताना, विश्वजीत राणे हे आजच्या दिवसाचे अनिल कपूर आहेत. एका दिवसाचे मुख्यमंत्री. ते आज सभागृहाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दिले तरी चालते. आज ते थेट निर्णय घेऊ शकतात.

त्यावर विजय सरदेसाई हे पुन्हा पुन्हा हा विषय काढतात, असा हस्तक्षेप राणे यांनी केला. त्यावर सरदेसाई यांनी जोक म्हणून घ्या म्हणत पुढचा प्रश्न विचारला. नायक या चित्रपटात अभिनेता अनिल कपूरने एक दिवसाचा मुख्यमंत्री साकारला होता. त्यावरून सरदेसाई यांनी राणे यांना हा टोला लगावला.

अहवाल गहाळ झाला ही चूक कुणाची? - विजय सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, नगरपालिकेचे उत्पन्न चार पटीने वाढले आहे. त्यामुळे कर कमी करता येऊ शकतो. त्यामुळे करदात्यांवरील बोजा कमी होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे. अहवाल गहाळ झाला तर ती चूक माझी आहे का? की चूक तुमच्या विभागाची? की चूक तुमच्या नगरसेवकांची? कोणाची चूक?

तुम्ही अहवाल काढता तुमच्याकडूनच गहाळ होतो. मी लोकांचा प्रतिनिधी आहे. लोकांसाठी अहवाल मागतो. याबाबत चौकशी करावी. अहवाल गहाळ होतोच कसा? याची चौकशी करा. तुम्हाला याची चौकशी करायची आहे की नाही?

त्यावर तुम्हाला मी या प्रकरणाची चौकशी करावयास हवी असेल तर मी चौकशी करतो, असे आश्वासन नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणेंनी दिले.

त्यानंतर सरदेसाई यांनी, तुम्ही केवळ जीआयएस मॅपिंग केले. पण त्याच्या निष्कर्षांवर कार्यवाही केली नाही. हा पैशाचा अपव्यय आहे, असे राणेंना सुनावले.

उत्तर गोव्यातील जीआयएस सर्व्हे सुरू - मंत्री विश्वजीत राणे 

यावर उत्त देताना उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे केला जाणार आहे, हे सरकारने यापुर्वीच स्पष्ट केला आहे. त्यामध्ये उत्तर गोव्यातील जीआयएस सर्व्हे सुरू झाला आहे, सर्व नगरपालिकांमध्ये हे काम केले जात आहे.

त्यात एकवाक्यता राहिल, याची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. आधी याबाबत काय झाले आहे, ते विचारात न घेता याबाबत कोणतेही आश्वासन देता येणार नाही. असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com