
कुंभारजुवे: माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांचा बालेकिल्ला म्हणून कुभारजुवे मतदारसंघाकडे पाहिले जात होते. २००२ साली ते मगो.च्या उमेदवारीवर आमदार निर्मला सावंत यांचा पराभव करून निवडून आले. १९८४ मध्ये मगोचे डॉ. काशिनाथ जल्मी, १९८९ मध्ये मगोचेच धर्मा चोडणकर अशी वाटचाल सुरू असताना १९९४ मध्ये काँग्रेसच्या कृष्णा कुट्टीकर यांनी चोडणकरांचा पराभव केला.
१९९९ साली काँग्रेसच्या निर्मला सावंत यांनी या यशाची पुनरावृत्ती केली. पण २००२ साली पांडुरंग मडकईकरांनी जी ‘एन्ट्री’ घेतली ती २०१७ पर्यंत कायम राहिली. मडकईकरांनी मगो- भाजप - काँग्रेस असा प्रवास करून सुद्धा कुंभारजुवे मतदारसंघातील मतदार मडकईकरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.
पण २०२२ साली मडकईकरांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे उमेदवारी त्यांची पत्नी जनिता यांना देण्यात आली खरी, पण त्यांचा काँग्रेसचे राजेश फळदेसाई यांच्याकडून दारुण पराभव झाला. पण निवडून आल्यानंतर फळदेसाई यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला कोणीच वाली उरला नाही. पण आता गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसतर्फे रिंगणात उतरून ३०७२ मते प्राप्त केलेल्या समील वळवइकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन काँग्रेसने योग्य चाल खेळली आहे.
आता या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी समील वळईकर यांना मिळणार, हे जवळजवळ निश्चित असले तरी भाजपची उमेदवारी कोणाला हे मात्र अनिश्चित आहे. सध्या विद्यमान आमदार राजेश फळ देसाई यांचे नाव आघाडीवर असले तरी मडकईकर यांनीही आपण यावेळी रिंगणात असणार असे जाहीर करून टाकल्यामुळे पेच वाढला आहे.
त्यामुळे एकीकडे समील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसची वाढलेली शक्ती तर दुसऱ्या बाजूला उमेदवारीच्या प्रश्नामुळे भाजपात पडू पाहणारी संभाव्य फूट असे चित्र सध्या कुंभारजुवेत दिसत आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश यांचाही भाजप उमेदवारीवर डोळा असल्यामुळे उमेदवारी करता रस्सीखेच होऊ शकते, असे दिसत आहे.
मडकईकर हे जरी सध्या भाजपमध्ये असले तरी उमेदवारी मिळाली नाही, तर दुसऱ्या पक्षाशी घरोबा करू शकतात, असेही संकेत मिळत आहेत. मात्र मडकईकरांमुळेच भाजप कुंभारजुवेत शिरकाव करू शकली होती, हेही तेवढेच खरे आहे. पण यावेळी ते भाजपमधील अंतर्गत दुफळीचे शिकार ठरू शकतात.
मागील निवडणुकीत आम आदमी पक्षाला १०२२ मते प्राप्त झाली होती. आता यावेळी आम आदमी व तृणमूल काँग्रेसची युती करतात की काय? ते बघावे लागेल. त्याचप्रमाणे गेल्या वेळी २४४२ मते प्राप्त केलेला आरजी पक्ष यावेळी काय भूमिका घेतो, यावरही या मतदारसंघातील समीकरणे अवलंबून आहेत.
मगो- भाजपची युती होणार की काय? हे अजून स्पष्ट झाले नसले तरी गेल्या वेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून ३८७० मते प्राप्त केलेले रोहन हरमलकर हे युती झाल्यास मगोतर्फे रिंगणात उतरू शकतात, तसे झाल्यास भाजप- काँग्रेस -म गो अशी तिरंगी लढत होऊन कुंभारजुवेत धक्कादायक निकाल लागू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.