Goa Politics: खरी कुजबुज, उपसभापतींचा जबरदस्त दणका!

Khari Kujbuj Political Satire: काणकोणचे काँग्रेस नेते जना भंडारी हे तसे सतत कार्यरत राहणारे राजकीय कार्यकर्ते. मागच्‍या निवडणुकीत काँग्रेसने त्‍यांना काणकोणातून उमेदवारी दिली होती.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

उपसभापतींचा जबरदस्त दणका!

नुकताच उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा पालिकेतून लोकांच्या फाईल्स गायब होत असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. परिणामी, पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र उपसभापतींचा हा दणका जबरदस्त बसला असून आता पालिकेत शिस्त आल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे! आता गेल्या-गेल्या पालिकेत फाईल्स मिळत आहेत आणि आवश्यक आदर कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे असे लोकांचे मत. आता ही शिस्त किती दिवस उरते हे पाहणे विशेष. अन्यथा नव्याचे नऊ दिवस नको म्हणजे मिळवले. तसेच पोलिस उपसभापती यांनी दिलेल्या तक्रारीचा खरोखर तपास करतात की फक्त तपास सुरू आहे, एवढ्यापुरता हे मर्यादित उरते ते देखील येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच… ∙∙∙

जनाभाई जोरात

काणकोणचे काँग्रेस नेते जना भंडारी हे तसे सतत कार्यरत राहणारे राजकीय कार्यकर्ते. मागच्‍या निवडणुकीत काँग्रेसने त्‍यांना काणकोणातून उमेदवारी दिली होती. मात्र रमेश तवडकर यांच्‍यासमोर त्‍यांची डाळ शिजली नाही, असे जरी असले तरी जनाभाई स्‍वस्‍थ बसलेले नाहीत. कधी आपल्‍या जनासेना माध्‍यमातून किंवा अन्‍य माध्‍यमांतून ते सतत आपण कसे बातम्‍यात राहणार, हे त्‍यांनी चांगल्‍यापैकी पाहिले. काल हे जनाभाई पुन्‍हा एकदा बातम्‍यात झळकले, ते कर्नाटकाचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍‍वर यांनी कारवारला दिलेल्‍या भेटीमुळे. डॉ. परमेश्‍वर हे कारवारला व्‍हाया दाबोळीमार्गे आल्‍याने त्‍यांना काणकोणातून कारवारला जावे लागले. जनाभाईंनी हीच संधी साधून काणकोण येथे त्‍यांचे भव्‍य स्‍वागत केले. यावेळी काँग्रेसचे वेगवेगळे स्‍थानिक नेतेही उपस्‍थित होते. या स्‍वागतामुळे जनाभाईंचे राजकारणातील वजन आणखीन वाढले, असे म्‍हटल्‍यास कोणी त्‍याला हरकत घेईल का? ∙∙∙

कमिटमेंटपेक्षा कृती हवी...

उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन म्हापसा शहरातील नियोजित रवींद्र भवनाविषयी माहिती दिली. त्यांनी कला व संस्कृती मंत्र्यांसोबत याविषयावर बैठक झाली असून,मंत्री महोदय हा प्रकल्पाबाबत सकारात्मक व कमिटमेंट असल्याचे म्हटले आहे. प्रशासकीय पातळीवर आवश्यक मदत देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे उपसभापतींनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. याच रवींद्र भवनाविषयी उपसभापतींनी मध्यंतरी मंत्री गोविंद गावडे यांच्यासोबत कुचेली येथील जागेची पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर हा प्रकल्प तसूभरही पुढे सरकरला नाही. उपसभापतींनी आपल्या निवडणूक अजेंड्यावर शहरातील रवींद्र भवन आपले प्रमुख ध्येय असल्याचे म्हटले होते. त्यामुळे किमान या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी रवींद्र भवनाची पायाभरणी व्हावी, अशी अपेक्षा म्हापसेकरांची आहे. कारण शहरवासीयांना कमिटमेंट पेक्षा आता कृती बघायची आहे. ∙∙∙

हा निर्णय त्यांच्यासाठी चांदी ठरेल?

जे झाले ते बरेच झाले, असे काही पंचायत सचिव व पालिका मुख्याधिकारी म्हणायला लागले आहेत. राज्यातील बेकायदेशीर बांधकामांची माहिती गोळा करून त्यावर योग्य कारवाई काय केली, याचा सविस्तर तपशील पंचायत सचिवांनी व पालिका मुख्याधिकाऱ्यांनी न्यायालयाला सोपविणे, आता न्यायालयाने बंधनकारक ठरविले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा किनारी भागातील सचिवांना होणार, अशी भीती काही सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी व्यक्त करतात. किनारी भागात मोठ मोठी बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली असून न्यायालय निर्णयाची भिती दाखवून काही सरकारी अधिकारी धनाढ्य बनणार व बेकायदेशीर बांधकामांना आश्रय मिळणार, अशी शंका काही सरपंच व पंच सदस्याच्या मनात निर्माण झाला आहे. आता पाहूया न्यायालयालाच आव्हान देण्याचे धाडस कोणत्या सरकारी अधिकाऱ्यात आहे.∙∙∙

Goa Politics
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

खांडेपार पंचायत प्रशासकाच्या हाती?

सध्या फोंड्यातील कुर्टी- खांडेपर पंचायतीचे राजकारण बरेच तप्त व्हायला लागले आहे. या पंचायतीत एक पंच भिका केरकर यांना गटविकास अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात जाऊन गटविकास अधिकाऱ्याच्या ऑर्डरवर स्थगिती मिळवली. पण प्रकरण येथे संपलेले नाही. ज्यांनी भिका अपात्र व्हावे, म्हणून याचिका दाखल केली होती, त्या सुनील खेडेकरांनी आता जिल्हा न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याकरता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आज २६ रोजी असलेली सरपंचाची-उपसरपंचाची निवडणूक १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून पंचायतीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या पंचायतीवर प्रशासकाचे राज्य सुरू झाले आहे. यामुळे मोठ्या उमेदीने सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केलेल्या विरोधी पक्षातील पंचाची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. शेवटी सत्ते पुढे शहाणपण चालत नाही, हेच खरे. हे आम्ही नाही बोलत हो, पंचायतीतले लोकच असे बोलायला लागले आहेत. आता बोला! ∙∙∙

वीरेशचा खरपूस समाचार

विधानसभेत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक तयारच असतात. परंतु ज्यावेळी ‘शेरासमोर सव्वा शेर’ उभा राहतो, त्यावेळी नमते हे घ्यावेच लागते. आरजीचे आमदार बोरकरांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे येन- केन-प्रकारेण घेरण्याचे प्रयत्न केला. शेवटी हौदात उतरून प्रश्‍नाला योग्य उत्तर मिळावे, यासाठी सभापतींसमोर दाद मागितली. परंतु विरेशला सभापतींना शिस्तीचे धडे दिले. एवढे करूनही काहीच होत नसल्याने सुमारे पंधराहून अधिक मिनिटे ते हौदातच उभे राहिले. या प्रकारावरून ज्येष्ठ मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना उभे राहून विधासभेची शिस्त पाळा... हा बाजार नव्हे, असे आवाहन करावे लागले. त्यामुळे एकाअर्थी सर्व बाजूनी विरेश एकटेच पडले.

Goa Politics
खरी कुजबुज: रवी नाईक पुन्हा फोंड्याचे आमदार?

उत्सव, जत्रांना राज्य दर्जा!

मडगावातील दिंडी आणि शिरगावातील लईराई जत्रेला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याची घोषणा सरकारने केली आहे. सर्वत्र त्याचे स्वागत होत आहे. मडगावकर म्हणजे मठग्रामस्थांची ही कैक वर्षांची मागणी होती. ती पूर्ण झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. दिंडीचा इतिहास फार जुना आहे. भीमसेन जोशींसारख्या मोठमोठ्या गायकांनी दिंडीत गायन सादर केले आहे. वास्कोचा सप्ताह सुध्दा तसा फार लोकप्रिय आहे. जांबावलीचा गुलाल जो कायम मंगळवारला भरतो, त्याचीही ख्याती आहे. फातर्पेकरांची जत्रा आहे. असे अनेक उत्सव आणि जत्रा आहेत, त्यांनाही राज्य उत्सवाचा दर्जा मिळावा, असे गोवेकरांना वाटते. आत्यंतिक महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे एक शिस्तबद्धता आणि पर्यटनाच्या दृष्टीने या उत्सवांना तेज प्राप्त होईल, असं भाविकांना वाटते.

शिक्षकांनाही हवाय छोटासा ब्रेक!

थकवा दूर करण्यासाठी व पुन्हा नवीन स्फूर्ती मिळविण्यासाठी माणसांना एक ब्रेक हवा असतो. यंदापासून माध्यमिक स्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे शिक्षकांची स्थिती दावणीत बैलांसारखी झाली आहे. दहावी परीक्षेचे पर्यवेक्षकांचे काम केल्यावर शिक्षक गेले उत्तर पत्रिका तपासणीला. त्यातच शिक्षण खात्याने घेतली दहावी विषयाबद्दल कार्यशाळा. आता पुन्हा पाठ्यपुस्तका संबंधित कार्यशाळा. त्यात आंतरिक परीक्षांचे प्रश्न पत्रिका तयार करणे. उत्तर पत्रिका तपासणे निकाल तयार करणे आणि आता नववीची बोर्ड परीक्षा. त्यात काही शिक्षकांना शाळेत नवीन मुले आणण्याचे कामही करावे लागते. गेल्या दोन महिन्यापासून शिक्षक व शाळा प्रमुखांना उसंत मिळाली नाही. आता ७ एप्रिलपासून पुन्हा नवीन शालेय वर्ष सुरू होणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटी सगळ्या परीक्षा संपणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुलांना ब्रेक मिळणार आहे. शहरांनाही एका आठवड्याचा ब्रेक द्यावा, एका आठवड्याची वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी, अशी मागणी शिक्षक करायला लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com