

पणजी: हणजूण-वागातोर येथे गुरुवारी ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी आयोजित ‘ब्लॅक कॉफी’ संगीत कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाचे आयोजन बेकायदेशीर असल्याचे सांगितले आणि पोलिस निरीक्षक, उपअधीक्षक व उपजिल्हाधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली.
त्यांनी आरोप केला की, संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तसेच पोलिस महासंचालकांना देखील या कार्यक्रमाची माहिती नव्हती.
पाटकर म्हणाले की, अग्निशमन दलाचे संचालक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कार्यक्रमासाठी कोणतीही ‘एनओसी’ दिलेली नव्हती. कार्यक्रमासाठी १० हजार तिकिटे २० रुपयांना विकण्यात आली, त्यामुळे मोठा आर्थिक लाभ झाला. हे सर्व भ्रष्टाचाराचे स्वरूप असून ‘ईडी’मार्फत याची चौकशी करण्याची आमची मागणी आहे.
काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने त्वरित हालचाल केली. ‘कोमुनिदाद ऑफ हणजुणे’ने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून कार्यक्रम रद्द केला. हा कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे हजारो प्रेक्षक कार्यक्रमस्थळाबाहेर अडकले.
कार्यक्रम ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी असल्यामुळे स्थानिक कॅथोलिक समुदायातही आक्षेप नोंदवला गेला. पाटकर यांनी सरकारवर आरोप केला की, अधिकारी, पोलिस व संबंधित मंडळांमध्ये कोणताही ताळमेळ नाही, त्यामुळे प्रशासन निष्क्रिय दिसत आहे. त्यामुळे बेकायदेशीर कार्यक्रमांचे आयोजन होऊ नये, तसेच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.