

म्हापसा: कमी वेळेत अधिक पैसे मिळविण्याच्या मोहात अडकलेल्या इंजिनिअर तरुणाला हणजूण पोलिसांनी ड्रग्सविरोधी मोहिमेंतर्गत अटक केली. तसेच या प्रकरणाची मुळे शोधून काढत मुंबईतील पुरवठादारालाही बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे ९७ एलएसडी पेपर ब्लॉट जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी हणजूण पोलिसांच्या पथकाने आसगाव येथील फुटबॉल मैदानाजवळ संशयास्पद हालचालींवरून अभिषेक सिंग (वय ३५ वर्षे, रा. ठाणे पश्चिम, महाराष्ट्र) याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे ९७ एलएसडी पेपर ब्लॉट आढळून आले, ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ९.७० लाख रुपये आहे. प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, अभिषेकने पुण्यातून ऑटोमेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
मात्र, कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याच्या मोहातून त्याने ड्रग्स विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याचे समोर आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी, उपनिरीक्षक नितेश शिंगाडी, कॉन्स्टेबल शानू राऊत, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, विजय नाईक, राजेश गोखरनकर, विनोद केरकर, प्रशांत परब, सदाशिव नाईक आणि आदित्य बागली यांच्या पथकाने केली.
तसेच मुंबईतील कारवाई पीएसआय अमीर तरल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. ही संपूर्ण मोहीम उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली. नशामुक्त भारत अभियानांतर्गत केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे, तर तस्करांची आंतरराज्य साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस कटिबद्ध असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
तस्करावर दिल्ली, मुंबईतही गुन्हे
केवळ संशयिताला पकडून न थांबता पोलिसांनी तस्करांचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी सखोल तपास सुरू केला. ड्रग्सचा पुरवठा कुठून झाला, याचा माग काढत हणजूण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. तेथून पोलिसांनी पुरवठादार हसन इमाम शेख (वय ५० वर्षे, रा. मुंबई) याला अटक केली. हसन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही दिल्ली व मुंबई पोलिसांत गुन्हे दाखल केल्याची नोंद आहे. संशयितांवर हणजूण पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम २२ (क) अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.