सुशांत कुंकळयेकर
मडगाव, फाेंड्यात हल्लीच झालेल्या दोन अपघाती मृत्यूंच्या घटनांनी पुन्हा एकदा गोवा हे ‘किलर स्टेट’ बनण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले. १ जानेवारी ते ११ जून या १६३ दिवसांत गोव्यात तब्बल १४३ जणांचा वाहन अपघातांत मृत्यू झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.
गोव्यातील अपघाती मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत असून दर महिन्याला सरासरी २७ जणांचा मृत्यू होत असून गोव्यात दर २८ व्या तासाला एक बळी जात आहे.
गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून जी आकडेवारी उपलब्ध झाली, ती पाहिल्यास या वर्षाच्या पहिल्या १६३ दिवसांत गोव्यात १२०० पेक्षा अधिक रस्ते अपघात झाले असून दरमहा सुमारे ९८५ अपघातांची नोंद गोव्यात होत आहे. मात्र, २०२३ च्या तुलनेत पाहिल्यास यंदाच्या बळींची संख्या पाचांनी कमी आहे. मागच्या वर्षी पहिल्या १६३ दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला होता.
यंदा सर्वांत जास्त अपघात बळी हे फोंडा पोलिस स्थानकाच्या अखत्यारित गेले आहेत. ही संख्या १४ एवढी आहे. वेर्णा पोलिस स्थानकाच्या अखत्यारित १२ बळींची नोंद झाली आहे. त्यात हल्लीच वेर्णा औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघातात पाच कामगारांच्या बळींचाही
समावेश आहे. तिसरा क्रमांक मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाचा लागतो. या पोलीस स्थानकाच्या कक्षेत ११ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यात पश्चिम बगल रस्त्यावर सिमेंटच्या कठड्याला धडक दिल्याने मृत पावलेल्या सीबर्ड - कारवार येथील दोन नौदल अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
अन्य पाेलिस स्थानकांमध्ये आगशी व डिचोली (प्रत्येकी ९), कुंकळ्ळी व पेडणे (प्रत्येकी ७), जुने गाेवे (६), फातोर्डा, मांद्रे, वाळपई व कोलवा (प्रत्येकी ५), मडगाव, हणजुणे, काणकोण, पणजी, पर्वरी, म्हापसा, कोलवाळ, कुळे, वास्को व मोपा (प्रत्येकी ४), कुडचडे, केपे, म्हार्दोळ व सांगे या पोलिस स्थानकाच्या कक्षेत प्रत्येकी दोन बळींची नोंद झाली आहे.
प्रत्येक अपघाताचा अभ्यास झाला पाहिजे. कारण कित्येक अपघात वाहनचालकांच्या चुकीने होतात, तर सदोष रस्त्यांमुळेही अपघात होतात. हे प्रमाण कमी करायचे असेल तर अपघाताचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करावी. - रोलंड मार्टिन्स, निमंत्रक, गोवा कॅन.
खराब रस्ते कारणीभूत
फाेंडा, मायणा-कुडतरी आणि वेर्णा या तिन्ही पाेलिस स्थानकांच्या कक्षेत मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती असून या बाहेरच्या कामगारांमुळे या भागात लोकवस्ती दाटीवाटीने उभी राहिली आहे, हे दिसून येते. त्यामुळेच अपघाती बळींची संख्याही वाढलेली दिसते. यातील बहुतेक बळी दुचाकीस्वारांचे आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणे, अतिवेगात वाहन चालविणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे याचबरोबर खराब रस्ते ही या अपघातांना कारणीभूत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.