Lata Mangeshkar: लतादीदींच्या जन्मभूमीत आपल्याला देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हे आपले भाग्य असून गोव्याच्या या भूमीत जन्मलेल्या अनेक दिग्गजांनी गोव्याचे नाव मोठे केले असल्याचे उद्गार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी काढले.
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात काल राजदत्त यांना जीवन गौरव पुरस्कार सिने अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अनुपम खेर यांच्या हस्ते पुरस्कार व तीन लाखांचा धनादेश, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मानपत्र देऊन राजदत्त यांना गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चतुरंगचे सुधीर जोगळेकर, विजय कुवळेकर तसेच ॲड. नरेंद्र सावईकर व डॉ. अजय वैद्य उपस्थित होते.
अनुपम खेर म्हणाले, चित्रपटसृष्टीतील एका उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचा आपल्या हातून गौरव झाला हे आपले भाग्य आहे. ध्येयनिष्ठा सद्वर्तन आणि प्रामाणिकपणा याचे दुसरे रूप म्हणजे राजदत्त. दरवर्षी चतुरंगच्या पुरस्कारात आपल्या ड्रामा स्कूलतर्फे दोन लाख रुपये जमा केले जातील.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की राजदत्त यांनी कलाकार कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. गोवा मुक्तीच्या संग्रामात 1955 च्या सत्याग्रहात पोर्तुगीज सैनिकांनी निष्ठूरपणे गोळ्या झाडल्या, पण गोवा मुक्तीची ज्योत इथेच प्रज्वलित झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या सत्याग्रहींत राजदत्त यांचा सहभाग होता. त्यामुळे गोवा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. यावेळी सुधीर जोगळेकर विजय कुवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद पवार यांनी मानपत्र वाचन केले. प्रास्ताविक डॉ. दत्ताराम देसाई यांनी केले, सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये, तर श्रीकुमार सरज्योतिषी यांनी आभार मानले.
‘गोवा मुक्तीच्या सत्याग्रहात माझा सहभाग’
राजदत्त म्हणाले, की या हृदयीचे त्या हृदयी सांगण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता असते तो संवाद या कार्यक्रमाने साधला गेला. गोवा मुक्तीच्या लढ्यात एकाच विचाराने भारलेले युवक एकत्रित आले आणि त्यांनी गोवा वेशीवर सत्याग्रह केला. त्यात सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली. त्यातूनच गोवा मुक्तीला चालना मिळाली.
लतादीदींचे कार्य खूप मोठे!
गोवा मुक्तीसंग्रामात गाण्यातून लोकांत जागृती करण्यासाठी लता मंगेशकर यांनी खर्च केला. आपल्या मधुचंद्र या चित्रपटानंतर काम नव्हते, त्यावेळी लताजींनी भालजी पेंढारकरांमार्फत आपल्याला चित्रपट दिग्दर्शनासाठी खर्च केला, पण या दोन्ही खर्चाची त्यांनी कुठेच वाच्यता केली नाही. लतादीदींनी माणुसकी जपली, पण कुठेच गवगवा केला नाही. गोमंतकीयांचे मन किती विशाल आहे याचीच ही प्रचिती असल्याचे राजदत्त म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.