मडगाव: शिरीष काणे यांच्या मृत्युमुळे हॉस्पिसियो इस्पितळातील समस्यांना वाचा फुटते आहे. खासकरून रुग्णवाहिका सेवा. तेथे कुठल्याही इमर्जन्सीच्यावेळी १०८ च्या रुग्णवाहिकेला बोलावून घेतले जाते. मात्र, या रुग्णवाहिकांना त्यांचे दळणवळणाचे क्षेत्र आखून दिलेले असल्यामुळे त्यांना आपले क्षेत्र सोडून दुसरीकडे जाता येत नाही. त्यामुळे मडगावची रुग्णवाहिका दुसऱ्या कामासाठी गेली असल्यास तातडीच्यावेळी ती उपलब्ध होऊ शकत नाही.
यासंबंधी बोलताना एका ज्येष्ठ डॉक्टरने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, यासाठीच ही १०८ रुग्णवाहिका सेवा खासगी कंपनीला चालवायला न देता ही सेवा आरोग्य खात्याच्या अधिकार क्षेत्राखाली आणावी, असा प्रस्ताव यापूर्वी देण्यात आला होता. मात्र, या खासगी कंपनीकडे केलेला व्यवहार काही जणांसाठी फायद्याचा ठरत असल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
सध्या हॉस्पिसियोकडे रुग्णवाहिका चालविणारे सात चालक आहेत. मात्र त्यातील तीन चालक हे हॉस्पिसियोत मल्टीटास्क सेवा कर्मचारी म्हणून घेतले होते. त्यांना आता रुग्णवाहिका चालक म्हणून वापरले जाते. अन्य तीन चालक अन्य इस्पितळात बदलीच्या स्वरुपात आणले असून हॉस्पिसियोचा स्वत:चा असा फक्त एकच रुग्णवाहिका चालक आहे. ही रिक्त झालेली पदे अजुन भरलेली नाहीत.
कुठलीही रुग्णवाहिका रस्त्यावर आणायची असेल तर ती फिटनेस सर्टिफिकेट असल्याशिवाय आणता येत नाही. मात्र सध्या ही सर्टिफिकेट नसल्याने बंद ठेवलेली ती रुग्णवाहिका त्यापूर्वी तब्बल तीन वर्षे ही सर्टिफिकेट नसताना रस्त्यावर चालविली जायची. या रुग्णवाहिकेचे हॉस्पिसियोकडे आरसी बुकही उपलब्ध नाही. अशा अवस्थेत ही वाहिका रस्त्यावर चालविली जात होती. एका अर्थाने गोव्यातील आरोग्य खातेच अशाप्रकारे दुसर्यांच्या जीवांशी खेळत होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.