
पणजी: करंझाळे-पणजी येथे गेल्या गुरुवारी जीवघेणा हल्ला झाल्यानंतर गोमेकॉत उपचार घेत असलेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना बुधवारी डिस्चार्ज देण्याची तयारी गोमेकॉतील डॉक्टरांनी सुरू केल्यामुळे राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते अस्वस्थ बनले आहेत.
‘गोमेकॉतील डॉक्टरांनी मंगळवारी रामा काणकोणकर यांच्या पत्नीला फोन करून बुधवारी डिस्चार्ज घेण्यास सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी आपण रामा काणकोणकर यांची गोमेकॉत जाऊन विचारपूस केली होती. त्यांना अजूनही चालता येत नाही. दोघांनी धरून त्यांना स्वच्छतागृहात न्यावे लागते. मारहाणीत त्यांच्या शरीराच्या खासगी भागांना गंभीर इजा झालेली आहे. एका डोळ्याने त्यांना अजूनही दिसत नाही. त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही.
अशा स्थितीत त्यांना इतक्या लवकर डिस्चार्ज देण्याच्या निर्णयाबाबत संशय आहे’, असे भंडारी समाजाचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी मंगळवारी सांगितले.
दरम्यान, रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जेनिटो कार्दोजोसह आठ संशयित आरोपींची पोलिस कोठडी बुधवारी संपत असल्याने त्यांना प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ‘काणकोणकर यांच्या निवासस्थानापर्यंत वाहन जाण्यास रस्ता नाही. वाहने रस्त्यावर पार्क करून त्यांच्या घरी पायी चालत जावे लागते. तेथून त्यांचे घर शंभर मीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत रामा काणकोणकर यांना प्रकृती पूर्णपणे न सुधारताच डिस्चार्ज देण्याची घाई का केली जात आहे?’, असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.
रामा काणकोणकर यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे सुधारलेली नाही. त्यांना चालताही येत नाही. अशा स्थितीत गोमेकॉतील डॉक्टरांनी त्यांना घाईगडबडीत डिस्चार्ज देऊ नये. बुधवारी आम्ही पुन्हा गोमेकॉत जाऊन रामा काणकोणकर यांची भेट घेणार आहोत. त्यांना डिस्चार्ज देण्याची तयारी डॉक्टरांनी सुरू केली असल्यास वरिष्ठांना त्याबाबत आम्ही जाब विचारणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
आरोग्यमंत्री या नात्याने विश्वजीत राणे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. रामा काणकोणकर हल्ला प्रकरण हे सरकारचे अपयश आहे. राज्यातील कायदा–सुव्यवस्था ढासळल्याचे या हल्ल्यातून दिसून आले. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर अन्याय होऊ देता कामा नये. हल्ला होण्याआधी काणकोणकर यांची प्रकृती जशी होती, तशी प्रकृती करूनच त्यांना समाजात सोडावे, असे आवाहनही संजीव नाईक यांनी केले.
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती (एससी) जमाती (एसटी) आयोगासह मानवाधिकार आयोगानेही गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या आयोगांनी राज्य सरकारला निवेदन सादर करून काणकोणकर यांना भरपाई मिळवून द्यावी तसेच उपचारांचा सर्व खर्च उचलण्याची मागणी सरकारकडे करावी, अशी साद संजीव नाईक यांनी घातली. सामाजिक कार्यकर्त्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला ही चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले.
रामा काणकोणकर यांना जखमी अवस्थेत घरी पाठवण्याची आगळीक बांबोळी इस्पितळाच्या डॉक्टरांनी केल्यास रामा यांना इस्पितळाच्या बाहेर खाट घालून त्यांच्यावर उपचार केले जातील, असा इशारा जुने गोवे येथे मेणबत्ती रॅलीत देण्यात आला. मंगळवारी समविचारी नागरिकांनी हल्ल्याचा निषेध करत मोर्चा काढला. यावेळी भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. आंदोलनात कुंभारजुवा मतदारसंघातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.