पणजी : मोपा विमानतळाला विरोध करणारे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे संधीसाधू असून मोपा विमानतळावर गोवेकरांना नोकऱ्या नसल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै. वेर्णेकर यांनी व्यक्त केले आहे.
वेर्णेकर म्हणाले, सरदेसाई यांचा मोपा विमानतळाला विरोध होता. मात्र, आत्ता तेच मोपा विमानतळावरच्या नोकऱ्यांबाबत बोलत आहेत. खोटे - नाटे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नसून त्यांचा त्यांच्या मतदारसंघाच्या पलीकडे कसल्याच स्वरूपाचा प्रभाव नाही. त्यांनी केलेले आरोप हास्यस्पद स्वरूपाचे आहेत. भाजप नेत्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच मोपा विमानतळ आकाराला येत असून राज्याच्या पर्यटनासाठी त्याचा मोठा हातभार लागणार आहे.
सध्या विमानतळाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या कामगारांची संख्या सरदेसाई यांनी नमूद केली आहे. त्यापैकी बहुसंख्य मजूर हे अर्धकुशल कामगार आहेत. त्यापैकी बहुतेकांना पूर्वीचा अनुभव आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे कामगार तिथेच असतील आणि विमानतळ पूर्ण झाल्यानंतर ते तिथून निघून जातील, असेही ते म्हणाले.
‘सरदेसाईंनी भाजपचे आभार मानावे’
एव्हीएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरद्वारे गोव्यातील तरुणांना विमानतळ कार्यान्वित होताच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. सध्याही विमानतळ परिसरात विविध प्रकारचे काम स्थानिकच करत आहेत. अशा स्वरूपाचे भव्य ग्रीनफील्ड विमानतळ उभारल्याबद्दल सरदेसाई यांनी भाजप सरकारचे आभार मानले पाहिजेत, असे गिरीराज यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.