Goa Murder Case: पर्यटनाला वास्‍कोत आले, चोरीसाठी वृद्धेला ठार केले; 26 दिवसांनंतर आंध्रातील दोघांना अटक

Goa Murder Case: खुनाचा छडा लावण्यासाठी वास्को पोलिसांबरोबर क्राईम ब्रँचच्या पथकाने संयुक्तपणे तपास सुरू केला होता.
Crime
CrimeDainik Gomantak

Crime News :

पणजी व मुरगाव, पिशी डोंगरी - वास्को येथील ज्येष्ठ महिला श्रीमती गायत्री रत्नाकर मराठे हिचा राहत्या घरी गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केलेल्या दोघांना कोणतेही धागेदोरे नसताना क्राईम ब्रँच व वास्को पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून आंध्रप्रदेशमधून २६ दिवसांनंतर गजाआड केले आहे.

संशयित विजय लक्ष्मण्णा गोर्ली (३५ वर्षे, बाबुलदोड्डी, पेंड्डाकबाबूर, आंध्रप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे, तर संशयित गोरेला रवींद्र (२५ वर्षे, केसिगो, आंध्रप्रदेश) याला घेऊन आज रात्रीपर्यंत गोवा पोलिस गोव्यात पोहचणार आहेत. हे दोघेही पर्यटनासाठी वास्कोत आले होते.

वास्कोत पत्रकार परिषदेत माहिती देताना अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले की, वास्को उर्वशी हॉटेलजवळ, गायत्री रत्नाकर मराठे (वय ७९) ही ज्येष्ठ महिला तिच्या घरात २१ एप्रिल रोजी मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी वेगाने हालचाली करत संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

Crime
Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

घरात चोरी झाली नसल्याने खुनामागील उद्देश स्पष्ट होत नव्हता. या खुनाचा छडा लावण्यासाठी वास्को पोलिसांबरोबर क्राईम ब्रँचच्या पथकाने संयुक्तपणे तपास सुरू केला होता. त्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. तसेच या घराच्या सभोवती दोन तरुण घटनेच्या दिवशी घुटमळत असल्याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिली होती. त्याच्या आधारे

तपास सुरू केला.

संशयित बिगर गोमंतकीय असल्याची खात्री झाल्यावर अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने तपास केल्यानंतर ते आंध्रप्रदेशमधील असल्याचा सुगावा लागला व त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली होती. यावेळी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत तसेच वास्कोचे निरीक्षक कपिल नाईक उपस्थित होते.

संशयित दोघेही एकाच गावातील मित्र होते व ते मद्याच्या तस्करी प्रकरणात तसेच चोऱ्यांमध्ये गुंतले असल्याने त्यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे. २० एप्रिल २०२४ रोजी ते मजेसाठी पहिल्यांदाच गोव्यात आले होते व वास्को रेल्वे स्थानकावर पहाटे ४ च्या सुमारास उतरले होते. रेल्वे स्थानकावरच ते झोपले व सकाळी उठून त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते त्या परिसरात चोरीच्या उद्देशानेच फिरत होते.

ते पिशी डोंगरी या भागात आले असता त्यांना एका घरात ज्येष्ठ महिला एकटीच रहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या घरात चोरी करण्याचे त्यांनी ठरविले. त्यामुळे त्यांनी जवळच असलेल्या बारमध्ये पुन्हा मद्यप्राशन केले. मद्यावस्थेत असलेल्या संशयितांनी घराचे दार खुले असल्याने आतमध्ये प्रवेश केला.

त्यांनी गायत्री मराठे यांना पकडून दोरीने बांधून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्याशी दोन हात करताना झटापट झाली व तिने आरडाओरड केल्याने शेजारी धावून येतील या भीतीने संशयितांनी तिचा दोरीने गळा आवळला तसेच गळ्याला जखम होऊन रक्तस्राव झाला. यावेळी त्या दोघांनी घरात चोरी न करता मागील दाराने तेथून पळ काढला.

२१ एप्रिलला ही खुनाची घटना सकाळी उघडकीस आली. गायत्री यांचा मृतदेह घरातच गळ्यावर चाकूने वार केलेल्या अवस्थेत सापडला होता. यावेळी मृतदेहाजवळ कटर व कपड्याचे बोळे वास्को पोलिसांना आढळून आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार मृत्यूचे कारण मानेवरील दुखापत आणि छातीवर दुखापतीमुळे तसेच श्वासोच्छ्वासामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले होते, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

आंध्रप्रदेशमध्येच सापडले संशयित

खून प्रकरणातील संशयित हे आंध्रप्रदेशमधील असल्याने क्राईम ब्रँचचे पोलिस पथक निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली आंध्रप्रदेशमध्ये पाठवण्यात आले. मात्र, हे पथक पोहचण्यापूर्वीच संशयित तामिळनाडूला पळून गेले होते.

त्यामुळे या पहिल्या कारवाईत पोलिसांना यश आले नाही. मात्र, पोलिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे पथक आंध्रप्रदेशमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही संशयित आंध्रप्रदेशमध्ये परतल्याची माहिती मिळाली व लगेच ती या पथकाला देण्यात आली.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

आंध्रप्रदेश पोलिसांशी संपर्क साधून संशयितांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती मिळवण्यात येत आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी कौतुक केले आहे. दरम्यान, पिशी डोंगरी येथील रहिवाशांनीही पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Crime
Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

गुप्तचर माहितीचा वापर:

या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक यंत्रणा तसेच गुप्तचर माहितीचा वापर करण्यात आला. संशयितांनी चोरीच्या उद्देशानेच हा खून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित विजयला न्यायालयाने ७ दिवसांची कोठडी दिली असून रवींद्र याला उद्या कोठडी घेतली जाईल, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

वास्कोत ११६ नागरिक राहतात एकटेच!

वास्को पोलिस स्थानकाच्या कक्षेत सुमारे ११६ ज्येष्ठ नागरिक एकटेच राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या भागात बीट पोलिस अधूनमधून भेट देऊन त्यांची काळजी घेतात. या नागरिकांनी मदतीसाठी १०० क्रमांकावर फोन करावा.

त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहणे आवश्‍यक आहे. त्यांनी दारे किंवा खिडक्या खुली ठेवू नयेत. घरासमोर एखादी संशयास्पद व्यक्ती घुटमळताना आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असा संदेश पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांना दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com