
कमलाकर साधले
दि. १८ एप्रिलच्या दैनिक ‘गोमन्तका’त सच्चिदानंद नाईक यांनी कचरा संकलन विषयावर भाष्य करताना व्यवस्थांची ‘आतली बाजू’ उघड करून दाखविली. सध्याची कंत्राटदारी पद्धतीत ग्रामपंचायत, नगरपालिका, राज्य सहकार, त्यांचे शासक, कर्मचारी, कंत्राटदार या सर्वांची ‘सोय’ केलेली असते. तसेच नागरिकांनाही ऐदीपणाची सवय झालेली आहे. वाट्टेल तशी कचरा निर्मितीची मुभा, वर्गवारी विषयीही बेफिकिरी खपते.
‘रेडिमेड’, आयते, पार्सल याला चटावलेपणाचे ‘सुख’ भोगायला मिळते. पण त्यातून कचरा प्रश्न मात्र दिवसेंदिवस जास्त जटिल बनत चालला आहे. विहिरीचे, झऱ्याचे शुद्ध पाणी कष्टप्रद वाटते. घरातील नळाचे पाणी कचरा वाहून नेणाऱ्या नदीनाल्याचे असते. (पण आयते असते ना!) पाणी खात्याने ते शुद्ध केलेले असेलच! पण रेतीतून फिल्टर केले, जंतुनाशकाचा मारा केला म्हणजे पिण्यालायक होते का? त्यात कचऱ्याबरोबर आलेले मायक्रोप्लास्टिक डोळ्यांना दिसत नसले तरी ‘डोळ्यांआड मसण पाड’ही डोळेझाक परवडणारी नसते. ते सूक्ष्म कण पाण्याबरोबर शरीरात शिरून शरीरभर ‘कॅन्सर-कॅन्सर’ खेळ खेळत असतात.
कचरा जाळून नष्ट होत नाही. त्यातील प्लास्टिकचे डायॉक्सीन हा कॅन्सरासूर जास्त सोपेपणी हवेतून फुफ्फुसात प्रवेश मिळवितो.
दीड- दोन वर्षांपूर्वीची गोष्ट झुवारी कारखान्याचे पर्सनल मॅनेजर माझ्याकडे आले. गोव्यात उग्र बनत चाललेल्या कचरा प्रश्नाविषयी एखाद्या गावाचा किंवा नगरपालिकेचा प्रश्न कंपनीने लोकहितार्थ हातात घ्यावा, अशा विषयावर सल्ला विचारण्यासाठी ते आले होते.
मी त्यांना विचारले, ‘कंपनीच्या कंपाउंडमध्ये त्यांच्याच कर्मचाऱ्यांची शे-दीडशे घरे आहेत. त्यांच्या कचऱ्याचे तुम्ही काय करता?’ तो घरगुती कचरा नेण्यासाठी मासिक ४०-४५ हजार रुपयांच्या करारावर त्यांनी कंत्राटदार नेमला होता. तो नियमितपणे घेऊन जात होता. पण तो त्याचे काय करतो हे कुणाला माहीत नव्हते. सह्याद्री घाटांतील अरण्यात एखाद्या निर्जन दरीत फेकणे अशक्य नव्हते.
मी त्यांना त्यांच्याच कंपाउंडमध्ये गांडूळखत प्रकल्प बनवून कचऱ्याचे खतांत रूपांतर करण्याचा सल्ला दिला. प्रकल्प कार्यान्वित होण्यापर्यंतचे मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागारही दिला. उत्तम प्रकल्प झाला. दोन महिने यशस्वीपणे चालल्यावर सभापतींच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. वापरात असलेल्या गांडूळ कुंडांच्या कठड्यावर बसून उपस्थितांनी चहा समोसाचा आस्वाद घेतला, इतका स्वच्छ व दुर्गंधीरहित होता.
आज घरोघरी (फ्लॅटमध्येसुद्धा) वापरता येतील अशी हलकी, सुटसुटीत व सुबक अशी संयंत्रे उपलब्ध आहेत. त्यात तीन पर्यायही आहेत. अॅरॉबिक, गांडूळ किंवा बायोगॅस. बरेच लोक वापरीतही आहेत.
मी गेली २० वर्षे माझ्या घरातील बागेतील शंभर टक्के सेंद्रिय कचरा खतात रूपांतरित करीत आहे. त्यांना मी, माझी सून (आर्किटेक्ट) माझा नातू (शालेय विद्यार्थी) सक्रिय आहेत. आपणास वाटेल तेवढा व तसला कचरा करावा व सरकारने त्याची विल्हेवाट लावावी ही वृत्ती बाळगून बसलेले लोकच आज कॅन्सरसारख्या रोगाचे एजंट बनून राहिले आहेत.
स्वतःच्या सेंद्रिय कचऱ्याने स्वतःच्या घरात परिवर्तन करणे व सुका कचरा साठवून आठवड्या-महिन्याकाठी नगरपालिका किंवा पंचायतीच्या घराघरांतून कचरा गोळा करणाऱ्याला किंवा भंगारवाल्याला देणे हा सर्वोत्तम उपाय आहे. कचऱ्याच्या निर्मूलनासाठी आपल्याला सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपण स्वत:च पुढाकार घेऊन आपल्यापुरता कचऱ्याचा प्रश्न सोडवू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.