गणेशोत्सव केवळ १९ दिवसांवर येऊन ठेपल्याने राज्यातील गणेशमूर्ती चित्रशाळेतील कलाकारांची लगबग वाढलेली दिसत आहे. चित्रकार गणेशमूर्तींच्या रंगकामात दंग असून मूर्ती आरक्षित करण्यासाठी लोकांची गर्दीही आता या चित्रशाळेत हळूहळू दिसू लागली आहे.
मडगावात जवळ जवळ पाच हजार गणेशमूर्तींची विक्री होत असल्याची माहिती गणेशमूर्ती तयार करणे व विक्रीची १०० वर्षांची परंपरा असलेल्या प्रभा आर्ट्सचे राजेंद्र बोरकर यांनी दिली. सध्या ते स्वत: गणेशमूर्ती करीत नसले तरी कारागिरांकडून जवळ जवळ ३५० ते ४०० गणेशमूर्ती ते तयार करून घेतात व नंतर रंगकाम करण्याचे काम मात्र ते स्वत: करतात. हे काम ते एप्रिल महिन्यापासून सुरू करतात.
बोरकर यांनी सांगितले की, दरवर्षी रंगाच्या, मातीच्या व मजुराची मजुरी वाढत असल्याने गणेशमूर्तीची किंमत यंदा १०० ते २०० रुपयांनी वाढली आहे. प्रकाश विठ्ठल प्रियोळकर हे मडगावमधील आणखी एक मूर्तीकार ज्यांची ७० पेक्षा जास्त वर्षांची गणेशमूर्ती तयार करण्याची परंपरा आहे.
पूर्वी पाट देऊन गणपती अरक्षित करण्याची परंपरा होती; पण आता ही परंपरा हळू हळू लोप पावत आहे. आता सर्वच गोष्टींकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिले जाते, त्यामुळे आम्हीही तोंडी, फोनवरून बुकिंग स्वीकारताे, अशी माहिती ‘सर्वांग सुंदर’ गणपती चित्रशाळेचे तुळसीदास नाईक यांनी दिली.
आपल्याकडे एक ते साडेचार फूट लांबीच्या मूर्ती ७०० ते ४००० रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. शिवाय आम्ही ४ सार्वजनिक गणपती बनवितो, ज्यांची किंमत १५ ते १७ हजार रुपये आहे. आम्ही गणेशमूर्तीसाठीचे बुकिंग दोन महिन्यांपूर्वीच सुरू करतो, अशी माहिती प्रकाश यांचे पुत्र प्रज्योत यांनी दिली.
आता कित्येक गणेशमूर्ती विक्रेते कोल्हापूरहून गणेशमूर्ती आणून विकतात. कोल्हापूर हे गणेशमूर्तींचे मोठे मार्केट झाले आहे. आम्ही गणेशमूर्ती तयार करण्यास जवळ जवळ मार्चमध्ये सुरवात करतो. आषाढी एकादशीपासून मूर्तींचे बुकिंग सुरू होते, अशी माहिती तुळसीदास नाईक यांनी दिली.
डिचोलीत बहुतेक चित्रशाळा तीन ते चार पिढ्यांपासून गणपती करण्याच्या पारंपरिक व्यवसायात आहेत. या चित्रशाळांत चिकण मातीपासून गणपती बनवतात. बहुतेक चित्रशाळांत गणपतीच्या मूर्ती तयार झाल्या असून, मूर्तीकारांनी आता रंगकाम करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. चतुर्थीला जेमतेम १९ दिवस उरले आहेत.
पारंपरिक मूर्तीकार गणपती करण्याच्या कामात मग्न असले, तरी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्तींच्या आक्रमणामुळे मूर्तीकार चिंतेत असल्याचे जाणवत आहे. ‘पीओपी’च्या मूर्तींवर वेळीच कायमची बंदी घातली नाही, तर भविष्यात पारंपरिक चित्रशाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती पारंपरिक मूर्तीकार व्यक्त करीत आहेत.
चतुर्थीला अवघेच दिवस असल्याने, डिचोलीत विविध चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाला आता भलताच वेग आल्याचे दिसून येत आहे. बहुतेक चित्रशाळांमधून रात्री जागू लागल्या असून, मये, कारापूर आदी काही चित्रशाळांनी पुरुष कलाकारांसह महिलांचेही हात काम करताना दिसून येत आहेत.
बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणारी आणि हिंदूंचा मोठा धार्मिक सण असलेली गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्याच्या ७ तारखेला साजरी होणार आहे. डिचोली तालुक्यात शंभरहून अधिक चित्रशाळा असून, मये गावात सर्वाधिक चित्रशाळा आहेत.
म्हापसा शहरात गणेशमूर्ती घडवणाऱ्या कार्यशाळा कालानुरूप सध्या लोप झाल्या असून बहुतांश ठिकाणी विक्री केंद्रांच्या स्वरूपातील दुकानेच कार्यरत आहेत, असे एकंदर चित्र आहे.
म्हापशात गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रमाण अगदीच नगण्य झाले असले तरी तरुण पिढीतील जयंत नाटेकर, धर्मा कवळेकर, विपुल नाटेकर यांच्याबरोबरीने इतर युवकांनी आपल्या वडिलोपार्जित चित्रशाळा सुरूच ठेवल्या आहेत.
गोव्यातील गणेशमूर्तींची सर्वाधिक विक्री म्हापसा शहरातच होत असते, असे ठामपणे म्हणता येईल. येथील युवा गणेशमूर्तीकार जयंत नाटेकर यांनी सध्या म्हापशातील हनुमान नाट्यगृहात चिकण मातीपासून बनवलेल्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्ती उपलब्ध करून विक्रीस ठेवल्या आहेत. तसेच धर्मा कवळेकर व विपुल नाटेकर यांनीही या ठिकाणी अशा गणेशमूर्ती उपलब्ध केल्या आहेत.
शिरवई-केपे भागात अनेक कुंभार समाजाचे लोक राहात असून यातील विश्वनाथ शेटकर हे गणेशमूर्ती बनविण्यासाठी बरेच प्रसिद्ध आहेत. गेल्या बत्तीस वर्षांपासून ते मूर्ती व मातीची भांडी तयार करतात. पूर्वी ते मुबई येथे मातीपासून वस्तू तयार होणाऱ्या कारखान्यात काम करीत होते, नंतर आपल्या गावात येऊन त्यांनी या व्यवसायाला सुरवात केल्याचे सांगितले.
गणेशचतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने गणेश चित्रशाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. शिरवई-केपे येथील श्री कामाक्षी गणेश चित्रशाळेत सध्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी या शाळेचे मालक विश्वनाथ शेटकर व त्यांचे कुटुंबीय दिवसरात्र काम करीत आहेत. आज सुमारे दीडशे मूर्ती आपण बनवीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही, उलट पुरुषांच्या चार पावले पुढेच असल्याचे तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे. याचे एक उदाहरण म्हणजे पेडणेच्या नगरसेविका आश्विनी अरुण पालयेकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. चार भिंतींच्या आड न राहता मुलाबाळांचे शिक्षण, घरसंसार व्यवस्थित सांभाळून तसेच समाजकार्य म्हणून राजकारणात उतरून आपल्या प्रभागाचा विकास करत असतानाच त्यांनी कलाही जोपासली आहे.
नगरसेविका पालयेकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की मागच्या २० वर्षांपासून आपण गणेशमूर्ती रंगवण्याचे काम करत आहे. याकामी आपल्याला पती अरुण पालयेकर यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. दीरही मदत करतात. ही कला सांभाळतानाच सामाजिक क्षेत्रातही कार्य सुरू आहे. आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.