यंदा गोव्यात (Goa) गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) कोरोना (COVID) संकटामुळे धुमधडाक्यात साजरी करता येत नसली तरी, ऋण काढून सण साजरा करतील पण परंपरा मोडणार नाही. चार पदार्थ कमी अन वायफळ खर्चाला कातर लावला जाईल, पण उत्सव थांबणार नाही.
मोठी खरेदी नसली तरी आवश्यक असलेल्या सामानाची खरेदी केली जात आहे, असे सांगेतील नागरिकांनी सांगितले. सांगेवासीय दुसऱ्यांच्या मदतीला धावून उत्सव साजरे करतात. गतवर्षीपासून ‘कोविड’ संकटाने सर्वांचे नुकसान केले. गेल्या वर्षी अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. पण, महागाई असली तरी उत्सव थांबणार नसून कमी जास्त प्रमाणात पारंपरिक पद्धतीने सांगेत चतुर्थी उत्सव साजरा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
सात दिवस उत्सवाची तयारी
महामारीच्या तोंडावर यंदा दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. गेल्या वर्षी कडक निर्बंध पाळून दीड दिवसात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. घरातील उत्सव सुद्धा अनेकजणांनी परंपरा मोडित दीड दिवसात मोरया केला होता. गेल्यावर्षीच्या मानाने यंदा बरीच शिथिलता दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात कोविड मोठ्या प्रमाणात नसल्याने सार्वजनिक मंडळानी गेल्या वर्षी दीड दिवस तर यंदा काहींनी पाच तर काहींनी सात दिवस उत्सव करण्याची तयारी चालविली आहे.
काही मंडळांतर्फे मर्यादित आयोजन
सांगे भागातील अनेक सार्वजनिक मंडळांपैकी वाडे-कुर्डी गणेशोत्सव मंडळ, नेत्रावळी गणेश मंडळ, ऋषिवन गणेश मंडळ, तुडव गणेश मंडळ, कोंगारे गणेश मंडळ, कोळंब गणेश मंडळ यांनी यापूर्वी सात व नऊ दिवस उत्सव साजरा केला आहे. पण, यंदा कोविड संकटामुळे मर्यादित स्वरूपात उत्सव साजरा करण्याचा विचार चालवला आहे. सांगे पोलिस ठाण्यात अकरा दिवस गणेशोत्सव असायचा. गेल्या वर्षी दीड दिवस होता, यंदाही तीच स्थिती आहे. कार्यक्रम नसला तरी चांगल्या प्रकारे देखावे करून सांगे पोलिस ठाण्याने अनेक राज्यस्तरीय बक्षिसे मिळविली आहेत.
नवसाला पावणारा संगमपूरचा राजा
सांगे भागात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यातही अकरा दिवस, नऊ, सात दिवसांत उत्सव साजरा करणारी मंडळे आहेत. सांगेतील संगमपूर सार्वजनिक गणेश मंडळ सर्वांत जुने गणेश मंडळ आहे. भक्तांच्या नवसाला पावणारा संगमपूरचा राजा असल्याने गेल्या वर्षी अनेकांचे नवस फेडायचे शिल्लक राहिले आहेत. म्हणून यंदा कोविड संकट असल्याने कोणताही कार्यक्रम न करता यंदा छोटाखानी मंडप घालून सात दिवस उत्सव साजरा करण्याची तयारी मंडळाने सुरू केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.