

काणकोण: पैंगीण पंचायत क्षेत्रातील पूरप्रवण भागातील पैंगीण बाजार ते आदीव्हाळ या गालजीबाग रस्त्याचा ३ कोटी ७० लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विकास कामाची पायाभरणी करण्यात आली. वेलवाडा पैंगीणचे पंच सतीश पैंगीणकर व महालवाडा वॉर्डाचे पंच सुनील पैंगणकर यांनी या विकास कामासाठी पुढाकार घेऊन मंत्री रमेश तवडकर यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा केला होता.
२००९ मध्ये आलेल्या पुरात या रस्त्यावर सुमारे दोन मीटर पाणी चढून रस्ता वाहतुकीसाठी सुमारे १६ तास बंद राहिला होता. तसेच पुरात एक व्यक्ती वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद राहत होता. त्यासाठी या रस्त्याला उंची देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कठडे उभारावेत, अशी मागणी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे आदीव्हाळ साकव कमकुवत झाला असून, त्याची बांधणी करण्याची मागणीही करण्यात येत होती.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वायंगण शेतजमीन आहे. या कामासाठी शेतकऱ्यांचा ना हरकत दाखला मिळविणे गरजेचे होते. त्यासाठीही पैंगीणकर यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. अखेर त्याची पायाभरणी मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर, सविता तवडकर, प्रभाकर गावकर, विनय तुबकी, सुनील पैंगणकर, सतीश पैंगीणकर, सिद्धार्थ देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य डॉ. पुष्पा अय्या, पंच शिल्पा प्रभूगावकर, महेश नाईक, अस्मिता जोशी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी वेलवाडा वॉर्डाचे पंच सतीश पैंगीणकर यांनी वॉर्डात ६.५० कोटी रुपयांची १८ विकासकामे चालू असल्याचे सांगितले. उपसरपंच सुनील पैंगणकर यांनी स्वागत केले. सरपंच सविता तवडकर यांनी प्रास्ताविक केले.
पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करणार
पायाभूत सुविधा मतदारसंघात देणे हे माझे कर्तव्य आहे. त्याचबरोबर युवकांना नोकरी देणे गरजेचे आहे. आता पोलिस भरती होणार आहे. त्यासाठी पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच १३०० कोटी रुपये खर्चून बाळ्ळी ते पोळे पर्यंतच्या चार पदरी महामार्गाचे बांधकाम एका महिन्यात सुरू होणार असून, त्यामुळे काणकोण ते बाळ्ळीपर्यंतचा प्रवास सुखकर व जलद होणार आहे, असे मंत्री तवडकर यांनी सांगितले.
कुणबी साडी विणण्याचे प्रशिक्षण केंद्र
मानवी विकास हेच मुख्य ध्येय ठेवून येणाऱ्या काळात स्वयंरोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुणबी साडी विणण्याचे प्रशिक्षण केंद्र ट्रायफेडच्या माध्यमातून काणकोण तालुक्यात सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे युवक-युवतींना घरबसल्या कुणबी साडी विणून रोजगार प्राप्त होणार आहे. येणाऱ्या काळात कृषी पर्यटन, दुग्ध प्रकल्प काणकोणात राबविण्यात येणार आहे, जेणेकरून रोजगारनिर्मिती होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.