Goa News: गालजीबाग, तळपण किनाऱ्यांची झीज थांबवण्यासाठी सभापती रमेश तवडकर यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे २०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्यामुळे दिल्लीवारी फलद्रूप झाल्याचे तवडकर यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, गोवा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शंभा नाईक देसाई, निवृत्त कार्यकारी वीज अभियंता संतोष लोलयेकर उपस्थित होते.
तोक्ते वादळात या दोन्ही किनाऱ्यांची प्रचंड झीज झाली असून शेकडो सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. या किनाऱ्यालगत लोकवस्ती असून तेथील घरांनाही धोका संभवत आहे. त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज जलशक्ती मंत्र्यांना पटवून देण्यात आली.
दिल्लीत सभापती तवडकर यांनी लोकसभा अध्यक्षांसह नऊ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. ही भेट यशस्वी झाल्याचे तवडकर यांनी दूरध्वनीवरून सांगितले. केंद्रीय बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचा विकास करण्यासाठी खास निधी देण्याची मागणी करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांच्याकडे ग्रामीण भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज डिस्पेन्सरी उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काणकोणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी महामार्गाजवळ जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
रस्ता रुंदीकरणासाठी 77 कोटींची तरतूद
करमल घाटात बेंदुर्डे ते गुळेपर्यंत 14 किलोमीटर क्षेत्रात चौपदरी महामार्गासाठी जमीन संपादनासाठी 77 कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे आदिवासी कल्याणासाठी योजना राबविण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली.
केंद्रीय कला व संस्कृती मंत्री अर्जुन मेघवाल आणि मीनाक्षी लेखी यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील कला व संस्कृतीच्या जतनासाठी विशेष मदतीची मागणी करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.