गाळ्यांचा ताबा तातडीने द्या; गोमेकॉ परिसरातील फळविक्रेत्‍यांची मागणी

गोमेकॉबाहेरील 63 फळ विक्रेत्‍यांना अद्यापही दुकाने गाळे वितरित केलेले नाहीत.
Vendors Outside GMC
Vendors Outside GMCDainik Gomantak

पणजी : सरकारने आश्‍वासन देऊनही गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या हॉस्‍पिटल (गोमेकॉ) बाहेरील 63 फळ विक्रेत्‍यांना अद्यापही दुकाने गाळे वितरित केलेले नाहीत. पावसाळ्यापूर्वी गाळे वितरित न केल्‍यास पुन्‍हा आंदोलनासारखा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा येथील फळविक्रेत्‍यांनी दिला.

सुमारे 11 महिन्‍यांपूर्वी राज्‍य सरकारने गोमेकॉ परिसरातील फळविक्रेत्‍यांचे गाडे काढून टाकले होते. गेल्‍या अनेक वर्षांपासून येथे व्‍यवसाय करून उदरनिवार्ह करणाऱ्या विक्रेत्‍यांनी त्‍यावेळी आंदोलन करून पर्यायी जागेची मागणी केली होती.

Vendors Outside GMC
खरी कुजबुज... दुर्दैव! एसटी समाजातच धमासान!

त्‍यावेळी सरकारने संबंधित विक्रेत्‍यांना नवीन गाळे बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते, अशी माहिती फळविक्रेत्‍यांचे प्रतिनिधी डॉम्‍निक परेरा यांनी दिली. आता हे गाळे बांधून झाले आहेत. तसेच गाळ्याचा कंत्राटदाराने याचा ताबा सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडे दिला आहे. याला जवळजवळ 1 महिना झाला असूनही साबांखाने हे गाळे विक्रेत्‍यांना दिले नसल्‍याचे परेरा म्‍हणाले.

आम्‍ही माहिती हक्‍क कायद्याअंतर्गत संपूर्ण प्रक्रियेची माहिती मागवली होती. आम्हांला मिळालेल्‍या माहितीनुसार संबंधित कंत्राटदाराने 63 गाळ्यांचा ताबा साबांखाकडे दिला आहे. तसेच राज्‍य सरकारच्‍या इतर खात्‍यांनी आवश्‍यक ते सर्व सोपस्‍कार पूर्ण केले आहेत. मात्र साबांखाच्‍या अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही होत नसल्‍याचा आरोप परेरा यांनी केला.

यासंबंधी माहिती घेण्यासाठी साबांखाच्‍या कार्यालयात गेलो, मात्र उपस्‍थित अधिकाऱ्यांनी आम्हांला अधिक माहिती देण्यास नकार दिला. आम्हांला न्‍याय देण्यासाठी माजी आमदारांनी सहकार्य केले. गाळ्यांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत आम्‍ही गप्प होतो. आता गाळे पूर्ण झाले आहेत. तसेच कंत्राटदाराने ताबा देऊनही आम्हांला ते वितरित केले जात नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे. आम्‍ही उघड्यावर कसा व्‍यवसाय करायचा, असा सवाल त्‍यांनी केला.

गाळ्याचे काम पूर्ण

आमची समस्या सोडविण्यासाठी आम्‍ही विद्यमान आमदारांची आणि मुख्यमंत्र्यांची तसेच साबांखा मंत्र्यांची भेट घेणार आहोत. पावसाळ्यापूर्वी दुकानगाळ्यांचा ताबा मिळावा, अशी आमची मागणी असल्‍याचे शकुंतला चोडणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आम्‍हाला शब्द दिल्‍यानुसार गाळ्याचे काम पूर्ण केले. पण आता साबांखाचे अधिकारी पुढील कार्यवाही करत नसल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कार्यवाही न केल्‍यास आम्‍हाला कडक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा चोडणकर यांनी यावेळी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com