Vishwajit Rane: गोव्यातील सत्तरी, म्हादई अभयारण्य येथे जंगलात लागलेल्या आगीची राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नौदलाचे उच्चअधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी हेलिकॉप्टरद्वारे आग लागलेल्या भागाची पाहणी केली. नौदलातील फ्लॅग ऑफिसर गोवा एरिया विक्रम मेनन त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये होते. गेल्या काही दिवसांपासून नौदलाने जंगलातील या आगी विझविण्यासाठी 14 हून अधिक मिशन्स केले आहेत. मोर्ले येथील आग विझविण्यासाठी 10 टनाहून अधिक पाण्याचा वापर केला गेला आहे.
दरम्यान, सत्तरीच्या जंगलात पाच दिवसांपासून आग्नितांडव सुरू आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री मोर्ले येथे उच्चस्तरीय बैठक बोलावून प्रशासनाची झाडाझडती घेतली होती.
आतापर्यंत घडलेल्या आगीच्या सर्व घटनांची चौकशी करून दोषी वन अधिकारी आणि गार्डवर कारवाईचे सक्त आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मोर्ले गडावर लागलेली आग विझविण्यासाठी वन विभाग, अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा आणि स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी आग लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम दिला. ज्या बीटमध्ये या दुर्घटना घडत आहेत, त्या सर्व वनरक्षकांची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
या बैठकीला वनमंत्री विश्वजीत राणे, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, मुख्य प्रधान वनसंरक्षक राजीवकुमार गुप्ता, अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाचे संचालक नितीन रायकर, पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंग बिष्णोई, पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.