

पणजी: वन खात्याचे विविध संवर्धन उपक्रम, वन्यजीव व्यवस्थापन आणि आगामी काळातील कृती आराखड्यावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. वनसंपदा, वन्यजीव संवर्धन, सार्वजनिक सुरक्षा आणि पावसाळी हंगामातील तयारीचा आढावा घेण्यात आला.तसेच वनक्षेत्रांमधील गस्त वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
या बैठकीत वन विभागाचे विविध अधिकारी तसेच खाते प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता उपस्थित होते. अलीकडेच घडलेल्या बिबट्याच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. वन्यजीव संशोधनाला चालना देण्यासाठी हैदराबाद येथील सीसीएमबीच्या सहकार्याने जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा उभारण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय वन्यजीव बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पशुवैद्यकीय सुविधा वाढविणे, स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि बचाव कार्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावरही चर्चा झाली. बोंडला प्राणीसंग्रहालयाचा जागतिक दर्जाच्या मानकांनुसार विकास करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेण्यात आला.
लागवड केलेल्या रोपांचे जिओ-टॅगिंग, त्यांची जिवंतता तपासणी आणि नियमित निरीक्षणाची यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचे निर्देश देण्यात आले. वन्यजीव बचाव आणि तक्रार निवारणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘वाइल्डलाईफ रेस्क्यू अँड कम्प्लेंट ॲप’च्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या (Tourists) सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले. राज्यातील धबधब्यांवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी वहनक्षमता अभ्यास आणि मानक कार्यपद्धती तयार करण्याचे काम गतीने करण्याचे निर्देश देण्यात आले. संरक्षित क्षेत्रांमध्ये ट्रेकिंग आणि पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या सर्व टूर व ट्रेक ऑपरेटरसाठी अनिवार्य नोंदणी व्यवस्था लागू करण्याबाबतही चर्चा झाली.
वन संवर्धन, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि सार्वजनिक सुरक्षा या चार प्रमुख स्तंभांवर आधारित धोरणांद्वारे गोव्याचा समृद्ध नैसर्गिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे.- विश्वजीत राणे, वनमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.