Forest Fires in Goa: केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षात गोव्यातील जंगलात आगीच्या घटनांमध्ये 700 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हे चिंताजनक चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जून 2023 या काळात गोव्यातील जंगलात आगीच्या 147 घटनांची नोंद झाली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेतील लेखी उत्तरात ही माहिती दिली. या उत्तरानुसार, भारतीय वन सर्वेक्षण (FSI) ने गेल्या पाच वर्षांत SNPP-VIIRS सेन्सर वापरून एकूण जंगलांमध्ये आगीच्या 399 घटना घटल्याचे स्पष्ट केले.
आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2018 ते जून 2019 या कालावधीत राज्यात 140 वणव्याच्या घटना घडल्या होत्या तर नोव्हेंबर 2019 ते जून 2020 या कालावधीत ही संख्या 47 पर्यंत खाली आली होती आणि त्यानंतरच्या जून 2021 मध्ये संपलेल्या त्याच कालावधीत ती 40 वर घसरली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत राज्यात केवळ 20 जंगलात आग लागल्याचे आढळले होते, ही संख्या यावर्षी 147 वर पोहोचली आहे.
विविध राज्य सरकारांकडून प्राप्त अहवालानुसार, आतापर्यंत जंगलात लागलेल्या आगीमुळे प्राणी आणि पक्षी त्यांच्या अधिवासातून स्थलांतरित झाल्यामुळे कोणतेही शाश्वत नुकसान लक्षात आलेले नाही.
या वर्षी मार्च महिन्यात, गोव्यात वन्यजीव अभयारण्ये, खाजगी जमीन, राखीव जंगले, कोमुनिदाद जमीन आणि इतर ठिकाणी अशा 74 तुरळक आगीच्या घटनांची नोंद झाली. तीन वन्यजीव अभयारण्यांमधील 2.27 चौरस किलोमीटरसह सुमारे 4.18 चौरस किलोमीटर वनक्षेत्र प्रभावित झाले.
मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातील एकूण 74 आगीच्या घटनांपैकी 32 आगीच्या घटना तीन वन्यजीव अभयारण्यांमध्ये नोंदल्या गेल्या.
वन मंत्रालयाने राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याबाबत माहिती दिली. ज्याद्वारे वन सीमावर्ती समुदायांना सशक्त बनविणे आणि त्यांना जंगलातील आग रोखण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी वन विभागांसोबत काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे, जंगलांना आगीचा धोका कमी करणे, आगीशी लढण्यासाठी वन कर्मचारी आणि संस्थांची क्षमता वाढवणे आणि जंगलातील आग प्रभावित क्षेत्रांचा जीर्णोद्धार करणे आदी कामे केली जातात.
मंत्रालयाने असेही म्हटले आहे की जंगलातील आग प्रतिबंधक आणि आगी शमनासाठी राज्यांना विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यात अग्निशामक रेषा तयार करणे आणि त्यांची देखभाल करणे, जलसंधारण संरचना, अग्निशामक उपकरणे खरेदी करणे, जागरूकता निर्माण करणे आणि संरक्षणासाठी ग्राम समुदायांना प्रोत्साहन देणे, या बाबींचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.