Margao Municipal Council: मडगावात जी गुंडगिरी वाढली आहे त्यामागे शहरात बेकायदेशीररित्या रस्त्यावर बसून विक्री करणारे परप्रांतीय विक्रेतेच कारणीभूत आहेत. काल जो मडगाव स्मशानभूमीत दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यामागेही हेच बेकायदेशीर विक्रेते जबाबदार होते.
या गुंडगिरीचे मूळ उपटून काढायचे असेल तर ह्या बेकायदेशीर विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. आठ दिवसांत या सर्व बेकायदेशीर विक्रेत्यांना मडगावातून हटवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्याकडे केली.
या नागरिकांनी नंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्र्विन चंद्रू यांची भेट घेऊन मडगावातील ही बेकायदेशीर विक्री थांबवावी आणि गुंडगिरीवर नियंत्रण आणावी अशी मागणी केली.
काल दवर्ली-दिकरपालचे पंच साईश राजाध्यक्ष आणि मडगाव स्मशानभूमीत देखरेखीचे काम करणारे जयवंत फोंडेकर या दोघांवर खुनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आज नागरिकांनी मडगाव पालिकेवर मोर्चा आणला हाेता. त्यात भाजपचे नेते शर्मद रायतूरकर यांच्यासह मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर आणि मडगाव न्यू मार्केटचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांचाही समावेश होता.
मडगावात जी बेकायदेशीर शहाळी विक्री, रस्त्यावर बसून केली जाणारी मासेविक्री आणि बेकायदेशीर ठेले उघडून केली जाणारी चिकन विक्री हीच मडगावातील गुंडगिरीचे मुख्य कारण आहे. त्यांना काही राजकारण्यांचा आशिर्वाद आहे.
त्यामुळेच आता त्यांची मजल स्थानिकांवर हात उभररण्या इतपत पोहोचली आहे. ही दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असे यावेळी शर्मद रायतूरकर यांनी सांगितले. ‘चून चून करके मारेगें’ ही भाषा या पुढे मडगावात चालू देणार नाही असेही ते म्हणाले.
या विक्रेत्यांवर कारवाई क़रण्यासाठी आपण पालिका अधिकार्यांना आदेश दिले आहेत. मडगावात कुठे बेकायदेशीर विक्रेते आहेत त्यांची सूची तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची आपली तयारी आहे.
मात्र ही कारवाई सुरु झाल्यानंतर कुणी या कारवाईच्या विरोधात जाऊन त्या विक्रेत्यांना पाठिंबा देऊ नये असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.