
पणजी: गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या फ्लाय९१ विमान कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येणाऱ्या उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता फ्लाय९१ने मोपो विमानतळावरील आठवड्यातील उड्डाणांची संख्या १०० वरून थेट १५० हून अधिक करण्याचा निर्णय घेतला आहे.
फ्लाय९१ने मार्च २०२५ मध्ये आपला पहिला वर्षपूर्तीचा टप्पा पार केला. गेल्या एका वर्षात कंपनीने देशांतर्गत विमानसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. सुमारे ३,५०० हून अधिक उड्डाणांची यशस्वी पूर्तता करताना, जवळपास १.७ लाख प्रवाशांनी फ्लाय९१च्या सेवांचा लाभ घेतला आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात फ्लाय९१ने दर आठवड्याला १०० पेक्षा अधिक नियमित उड्डाणे यशस्वीपणे पार पाडली आहेत. वेळेचे काटेकोर पालन हे फ्लाय९१चे प्रमुख वैशिष्ट्य ठरले असून, प्रवाशांना विश्वासार्ह सेवा देण्यावर कंपनीचा भर राहिला आहे.
एप्रिल ते जूनदरम्यान देशभरात सुट्ट्यांचा हंगाम सुरू होतो. या काळात गोव्याला पर्यटनासाठी येणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळेच फ्लाय९१ने ही वाढीव उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढीव उड्डाणांमुळे प्रवाशांना अधिक वेळा आणि विविध ठिकाणांहून गोव्यात येण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः कामकाजासाठी, पर्यटनासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.
प्रवाशांच्या सुखसोयीसाठी फ्लाय९१ने एक नवीन सेवा सुरू केली आहे. उड्डाणादरम्यान गरम जेवण व पेयांची पूर्व-बुकिंग सेवा. ही सेवा देणाऱ्या मोजक्या प्रादेशिक एटीआर ऑपरेटर्सपैकी एक बनण्याचा मान फ्लाय९१ ला मिळाला आहे.
आमच्या तिसऱ्या एटीआर विमानाचं फ्लीटमध्ये स्वागत ही आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. एकाच वेळी दोन विमानांची खरेदी हे आमच्या स्थिर, विश्वासार्ह आणि नियोजनबद्ध वाढीच्या धोरणाचा भाग आहे, असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चको यांनी सांगितले.
उड्डाण ५.० अंतर्गत सध्या सुरू असलेल्या सिंधुदुर्ग, जळगाव आणि अगत्ती या केंद्रांना बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि गोवा यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सेवांना आणखी विस्तारणार आहे. फ्लाय९१चे आगामी लक्ष्य देशभरातील ५० हून अधिक शहरांना सेवा देणं आहे.
तसेच, येत्या पाच वर्षांत ३० एटीआर विमानं फ्लीटमध्ये समाविष्ट करण्याचा उद्देश आहे. यासाठी, विविध प्रादेशिक केंद्रांवर आधारित नवीन विमानसेवा सुरू करण्याची योजना फ्लाय९१ने आखली आहे, असं मनोज चको यांना सांगितलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.