
पणजी: उत्तर गोव्यातील आंब्याच्या घाऊक विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई करत तपास मोहीम राबवली. या तपासात एकूण २४ आंब्याचे आणि ४ इतर फळांचे नमुने घेण्यात आले असून, म्हापसा बाजारातील दोन दुकानांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळल्याने त्या दोन्ही दुकानांचा साठा तातडीने जप्त करण्यात आला आहे.
एफडीएच्या या पथकात उत्तर गोवा विभागाचे नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, लेनिन डीसा, अमित मांद्रेकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी सफिया खान यांचा समावेश होता. ही कारवाई एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पारपडली.
शिवोली येथील ७ स्थानिक आंबा विक्री केंद्रे आणि म्हापसा सबयार्डमधील ८ परराज्यातून आंबा आणणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.
यावेळी सुमारे १८० कॅरेट्स आंबे आणि ४५० किलो केळी यांचा साठा तपासण्यात आला. म्हापसा यार्डमधील दोन दुकानांत आढळलेल्या संशयास्पद पदार्थांमुळे संबंधित साठा जप्त करण्यात आला असून, नमुने रासायनिक अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई आणखी तीव्र करत आता म्हापसा शहरातील प्रसिद्ध 'वाळके हॉटेल' सील केले आहे. हॉटेलच्या परिसरात अस्वच्छताआढळली असून अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या तत्पर आणि कठोर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. असुरक्षित अन्न पद्धतींच्या नियमांबद्दल अन्न व औषध प्रशासन अगदी काटेकोर असल्याचं या धडक कारवाईतून आढळून आलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.