FC Goa Appoint Manolo Marquez as New Head Coach: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्ले-ऑफ फेरी गाठण्यात अपयश आल्यानंतर एफसी गोवा संघ व्यवस्थापकाने कार्लोस पेनया यांना प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले, त्यानंतर अपेक्षेनुसार भारतात मागील तीन मोसम लक्षवेधी ठरलेले स्पॅनिश मानोलो मार्केझ यांची शुक्रवारी अनेक वर्षांसाठी नियुक्ती केली.
मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघ २०२३-२४ आणि त्यानंतरही खेळेल, असे क्लब व्यवस्थापनाने जाहीर केले. मागील मोसमात एफसी गोवा संघाला आयएसएल स्पर्धेत सातवा क्रमांक मिळाला होता, तसेच सुपर कपची उपांत्य फेरी गाठता आली नव्हती.
मार्केझ यांनी आयएसएल स्पर्धेत २०२० ते २०२३ या कालावधीत हैदराबाद एफसी संघाला मार्गदर्शन केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादने आयएसएल करंडकही जिंकला. त्यामुळे ते भारतीय फुटबॉलला नवखे नाहीत. खेळाडू या नात्याने आठ वर्षांच्या कारकिर्दीनंतर ते प्रशिक्षणाकडे वळले. प्रशिक्षक या नात्याने त्यांच्यापाशी तब्बल दोन दशकांचा अनुभव आहे. सध्या ते ५४ वर्षांचे आहेत.
‘‘एफसी गोवाशी करार करताना मी अतिशय तृप्त आहे. हा देशातील एक उत्कृष्ट संघ आहे. आयएसएल स्पर्धेत आम्ही तीन वर्षे आहोत आणि ही स्पर्धा, तसेच लीगमध्ये खेळण्याऱ्या खेळाडूंबाबत आम्हाला महत्त्वपूर्ण बाबींची माहिती आहे. या वर्षी आमचा संघ चांगला व स्पर्धात्मक असेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे फातोर्ड्यात संघ खेळताना एफसी गोवाचे चाहते आनंद लुटतील याची अपेक्षा आहे,’’ असे मार्केझ यांनी एफसी गोवाशी करार केल्यानंतर सांगितले. एफसी गोवा संघ वरची जागा मिळविण्यासाठी मैदानावर झुंजेल असे सांगण्यात ते विसरले नाहीत.
एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी मार्केझ यांचे स्वागत केले. मानोलो आणि प्रशिक्षणातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हैदराबाद एफसी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सौहार्द आणि विजयी मानसिकता रुजविली. तशाचप्रकराचे वातावरण ते तयार करतील, असा विश्वास रवी यांनी व्यक्त केला. बेनिटो माँटाल्वो, असियर रे सांतिन, होजे कार्लोस बार्रोसो हे मार्केझ यांच्या सपोर्ट स्टाफमधील सहकारी असून अनुक्रमे तांत्रिक समन्वयक, गोलरक्षक प्रशिक्षक व स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आहेत.
स्पॅनिश लीग ते आयएसएल विजेतेपद
प्रशिक्षक या नात्याने एफसी गोवा हा मानोलो मार्केझ यांचा १४वा संघ आहेत. २००३ साली पीबी अंग्वेरा संघाचे प्रशिक्षक या नात्याने त्यांनी कारकिर्दीस सुरवात केली. २०१६ साली त्यांची यूडी लास पाल्मासच्या राखीव संघाच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने स्पेनमधील तेर्सेरा डिव्हिजन (चतुर्थ श्रेणी) विजेतेपद मिळवून सेगुंडा बी डिव्हिजन (तृतीय श्रेणी) स्पर्धेसाठी पदोन्नती मिळविली. या कामगिरीमुळे ला-लिगा स्पर्धेत त्यांच्याकडे लास पाल्मासच्या मुख्य संघाचे प्रशिक्षकपद आले.
२०२० साली हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक बनण्यापूर्वी मार्केझ यांनी क्रोएशियातील प्रमुख संघ एनके इस्ट्रा १९६१, थायलंड लीगमधील रात्चाबुरी एफसी या संघांचेही प्रशिक्षकपद भूषविले. मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत हैदराबादला २०२०-२१ मध्ये पाचवा, तर २०२१-२२ मध्ये दुसरा क्रमांक मिळविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादने २०२१-२२ मध्ये आयएसएल करंडक प्रथमच जिंकला. गतमोसमात (२०२२-२३) हैदराबादने साखळी फेरीत २० पैकी १३ सामने जिंकताना ४२ गुणांसह दुसरे स्थान मिळविले. ते प्रशिक्षक असताना हैदराबादच्या दहा खेळाडूंना भारतीय फुटबॉल संघात स्थान मिळाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.