डिचोली : भावकई-मये येथील खाजन बांधाला भगदाड (खावटे) पडल्याने मोठ्या प्रमाणात नदीचे खारे पाणी जवळच्या शेतीत घुसत आहे. त्यामुळे मिरचीसह भाजी लागवड करपून गेली आहे. परिणामी यंदा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ते पुरते हैराण झालेले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही भावकई येथील शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन मिरचीसह हळसांदा, वाल आदी भाजी लागवड केली होती. ती बहरात येत असतानाच जवळील नदीचे खारे पाणी शेतीत घुसल्याने मिरची आणि भाजी लागवडीवर विपरित परिणाम झाला आहे. बहुतांश मिरची आणि भाजीचे मळे पूर्णपणे करपून गेलेले आहेत. मळ्यांतील डबकेवजा विहिरींमध्येही खारे पाणी घुसल्याने त्या दूषित बनल्या आहेत.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावकई खाजन बांधाला गेल्या सप्टेंबर महिन्यात भगदाड पडले आहे. मात्र कल्पना देऊनही या समस्येकडे भावकई खाजन शेतकरी कूळ संघटना व संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. फेब्रुवारी महिन्यात डिचोलीचे मामलेदार आणि संबंधितांना निवेदनही दिले होते. वेळीच जर हे भगदाड बुजवले असते तर बहरात आलेली मिरची, भाजी लागवड मातीमोल झाली नसती.
मेहनत आणि पैसा वाया
खारे पाणी शेतीत घुसल्याने मिरची, भाजी पीक धोक्यात आले आहे. बहुतांश लागवड करपून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठी आपत्ती ओढविली आहे. मिरची आणि भाजीचे मळे करपून गेल्याने यंदा शेतकऱ्यांची मेहनत आणि पैसाही वाया गेला आहे. मिरची पिकात तर ६० ते ७० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी यंदा मिरची आणखी महाग होण्याची चिन्हे दिसत आहेत, असे एक शेतकरी अमर गावकर यांनी सांगितले.
खाऱ्या पाण्यामुळे मिरची, भाजी लागवडीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ही सर्व लागवड करपून गेली आहे. मेहनत अशी वाया गेल्याचे पहावत नाही. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यंदा घरात वापरण्यासाठी मिरची बाहेरून विकत घ्यावी लागणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.
- सुशीला गावकर, शेतकरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.