Vedanta Mining Transport Dispute Pilgao Farmers Protest
डिचोली: शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ''रस्ता बंद'' आंदोलनप्रश्नी अद्याप सर्वमान्य तोडगा न निघाल्याने पिळगावात आंदोलनाची स्थिती ''जैसे थे'' राहिली आहे. या आंदोलनप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज (गुरुवारी) प्रशासकीय पातळीवर बैठक घेण्यात आली.
एकाबाजूने शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याची कंपनी व्यवस्थापनाने तयारी दाखवली. तर दुसऱ्याबाजूने कामावरून कमी केलेल्या स्थानिक कामगारांच्या विषयीची बोलणी फिस्कटली.याप्रश्नी उद्या पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आता कंपनी व्यवस्थापन काय निर्णय घेते, त्याकडे पिळगाववासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘वेदांता'' खाणीवरील खनिज वाहतूक आज सलग दुसऱ्या दिवशीही बंद होती. आमची शेती पूर्ववत आम्हाला द्या, ही मागणी पुढे करुन पिळगावच्या शेतकऱ्यांनी कालपासून (बुधवारी) आंदोलन सुरु केले आहे.
''वेदांता''च्या खाणीवरून जाणारा रस्ता आमच्या शेतीतून जात आहे, असा दावा करुन शेतकऱ्यांनी सारमानस परिसरात अडथळे निर्माण करुन खनिज वाहतुकीचा रस्ता बंद केला आहे.
आज बैठकीवेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी आणि ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता.
उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज संयुक्त बैठकीला खाणखात्याचे अधिकारी, वेदांता'चे अधिकारी तसेच पिळगावच्या शेतकऱ्यांसह विधी सल्लागार ॲड. अजय प्रभूगावकर, सरपंच मोहिनी जल्मी अन्य पंच, ग्रामस्थ होते. शेतकऱ्यांनी गाळ काढून आमची शेती आम्हाला द्या,अशी मागणी लावून धरली.
या बैठकीत शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडले. शेतकऱ्यांच्या मागण्या पाच वर्षांच्या आत टप्प्याटप्प्याने सोडविण्याची ग्वाही ‘वेदांता’च्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र कमी केलेल्या कामगारांना सेवेत घेण्यास कंपनीने तयारी दर्शवली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.