पेडणे : मोपा (Mopa) लिंक रोडच्या बांधकामाला आक्षेप घेत वारखंड नागझर पंचायतीने नोटीस बजावली होती. तरीही भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर व पेडण्याचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी या नोटीसीकडे दुर्लक्ष करून पोलिस संरक्षणात कंपनीला काम सुरू करण्याचा आदेश दिला. या आदेशाचा तसेच अधिकाऱ्यांचा निषेध आज (रविवारी) पेडण्यातील रहिवासीयांनी केला. येत्या 24 तासांत काम बंद ठेवा, अन्यथा पोलिस ठाण्यात बसून धरणे आंदोलन करू, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. मोपा लिंक रोडचे काम बंद ठेवण्याच्या मागणीसाठी त्यांनी आज रास्ता रोको केला.
वारखंड पंचायतीचे सरपंच संजय तुळसकर यांनी लिंक रोड प्रकरणात काम कायदेशीर होत नसल्याचे लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतली होती. सात दिवसांत सर्व कागदपत्रे पंचायतीच्या कार्यालयात सादर करण्याचा आदेश सरपंच तुळसकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना देऊन तशी नोटीस काढली होती. याची प्रत उपजिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवून देण्यात आली होती. परंतु याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि पुन्हा बेकायदेशीर कामाला सुरवात करण्यात आली. या कृतीचा पंचायत तसेच ग्रामस्थांनीही तीव्र निषेध करीत आज रास्ता रोको केले.
आंदोलनस्थळी महिला व ग्रामस्थांकडे अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा केली. त्यानंतर आंदोलनस्थळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा, अशी मागणी रहिवासीयांनी भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडे केली.
आंदोलकांनी घटनास्थळी चंद्रकांत शेटकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी ‘गोंयचो आवाजा’चे उपाध्यक्ष रोशन मातायश, व्यंकटेश नाईक, ॲड. जितेंद्र गावकर, ॲड. प्रसाद शहापुरकर, सरपंच संजय तुळसकर, भारत बागकर, रेखा परब महाले, शैलेंद्र वेलिंगकर, सुदेश तिवरेकर, करिश्मा गाड, भास्कर नारुलकर, वृषाली तुळसकर, रुक्मिणी तुळसकर यांनी आंदोलनात भाग घेतला होता. आंदोलनस्थळी (Movement) मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
चार तास रास्ता रोको
चार तास रास्ता रोको केल्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्याकडे चर्चा करताना ग्रामस्थ म्हणाले की, भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी कोणत्या आधारावर कंपनीला काम सुरू करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत आम्हाला लेखी उत्तर द्या, तरच आम्ही रास्ता रोको थांबवू. त्यानंतर उपजिल्हाधिकारी आजगावकर यांनी आंदोलनकर्त्यांना समजावून सांगून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देऊ, असे सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट नकार देत आंदोलन सुरूच ठेवले.
पोलिस निरीक्षक यांची मध्यस्ती
आपल्या मागण्यांचे निवेदन मिळालेले असून, हे निवेदन आपण वरिष्ठांकडे देऊन या प्रकरणी लक्ष घालू, असे आश्वासन पोलिस (police) निरीक्षक विक्रम नाईक यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर नागरिकांनी येत्या 24 तासांत योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा पोलिस ठाण्यात बसून धरणे आंदोलन छेडू, असा इशारा देऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.