वाळपई: पिसुर्ले - सत्तरी येथे शेतकरी संघटनेने विविध मागण्या घेऊन खनिज खाण कंपनी विरोधात गुरुवारपासून आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाला आज वेगळे वळण मिळाले असून पिसुर्लेतील सुमारे 15 शेतकऱ्यांना वाळपई पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. यात आंदोलन प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते व एक शेतकरी हनुमंत परब यांना वाळपई पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने ते जबर जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरा वाळपई प्राथमिक न्यायालयात त्यांना जामिन मिळाला आहे, तर अन्य जणांना उपजिल्हाधिकारी कार्यालयातून सोपस्कार करून दुपारी सोडण्यात आले. (farmer protestors arrested in goa)
याबाबत अधिक माहिती अशी, की पिसुर्ले भागात जवळपास 151 शेतकरी (Goa Farmer) असून या शेतकऱ्यांनी सेसा गोवा खनिज खाण कंपनीकडे विविध मागण्या मांडल्या होत्या. खनिज पीठातील पाणी शेतीला पुरविणे, मागील तीन वर्षांची नुकसान भरपाई देणे, 80 एकर जागेतील शेतीतील खनिज माती काढणे, शेतीला संरक्षक कुंपण बांधून देणे, शेतकऱ्यांचा विमा उतरविणे अशा विविध मागण्या ठेवल्या होत्या. त्याचे निवेदनही खाण कंपनी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस, मुख्यमंत्री आदींकडे सादर केले होते, पण त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी कालपासून शांततेच्या मार्गाने अंतर्गत रस्त्यातील खनिज वाहतुकीच्या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. आज दुसऱ्या दिवशी सकाळी आंदोलनाला पुन्हा सुरवात झाल्यानंतर घटनास्थळी वाळपईतून पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन वाहनातून वाळपई पोलिस स्थानकात नेले.
दरम्यान, दुपारी हनुमंत परब यांना मारहाण केल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांची भेट घेतली व मारहाणीबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्यांनी लेखी तक्रार देण्याची सूचना केली. यावेळी वाळपई पोलिस निरीक्षक श्री. फडते, डीवायएसपी सागर एकोस्कर उपस्थित होते.
जामीन मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हनुमंत परब म्हणाले आजची घटना दुर्दैवी असून एका शेतकऱ्यावर पोलिसांनी (Goa Police) मारहाण केली आहे. आम्ही मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे याआधीच दिला होता. त्याप्रमाणे कालपासून पिसुर्लेतील शेतकऱ्यांनी खाण कंपनीविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. आज सकाळी आम्हाला वाळपई पोलिस स्थानकात आणण्यात आले. त्यावेळी मला पाच पोलिसांनी मिळून बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत डोळ्यांकडील भागातून रक्त वाहू लागले. माझ्यावर पायांनी, हातांनी, दंडुक्यांनी अकारण मारहाण केली. मारहाण का करता असे विचारल्यावर देखील काहीही कारण न सांगता पोलिस मला मारहाण करत होते. मी त्यावेळी फक्त संरक्षणासाठी प्रतिकार केला होता. त्यावरून मीच पोलिसांवर हात उचलला असा खोटा गुन्हा माझ्यावर करण्यात आला आहे.
‘न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार’
ज्या ठिकाणी आंदोलन सुरु होते तो रस्ता सार्वजनिक नाही, अंतर्गत आहे. असे असताना शांततेने चाललेल्या आंदोलनाला फूट पाडावी, आंदोलन बंद व्हावे म्हणून खाण कंपनीच्या आशीर्वादाने आजचा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी या प्रकरणी योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले होते. उपजिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, पण अजून बैठक झालेली नाही. खाण कंपन्यांनी खाण पीडित शेतकरी वर्गावर अन्याय केला असून तो आता खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे.
आम्ही हनुमंत परब यांना मारले नाही..!
वाळपईचे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी सांगितले, की आम्ही पोलिसांनी हनुमंत परब यांना मारहाण केली नाही. उलट परब यांनी आमच्या अंगावर येऊन कॉलर पकडली. त्यावेळी तो खाली पडला व त्याला दुखापत झाली. त्यावरूनच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मारहाणीनंतर रक्तबंबाळ अवस्थेत असूनही मला दीड - दोन तासांनी वाळपई सरकारी आरोग्य केंद्रात सायंकाळी तपासणीसाठी नेण्यात आले. माझ्या छातीवर, पोटावर देखील मारण्यात आले. या घटनेत जाणूनबुजून मला टार्गेट करण्यात आले आहे. जेणेकरून आंदोलन बंद होईल व खाण कंपनीचे मनसुबे यशस्वी होतील. या प्रकरणी आपण सरकार दरबारी संबंधित खात्यात तक्रारीव्दारे न्याय मागणार आहे.
- हनुमंत परब, शेतकरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.