Goa Police: कलंकित खाकी वर्दी आणखी संशयाच्‍या घेऱ्यात; नोकऱ्यांच्या नावाखाली राज्यात फोफावला चोरबाजार

Goa Land Grabbing Case: गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून पळालेला की पळवलेला सुलेमान मोहम्‍मद खान ऊर्फ सिद्दीकी याने जारी केलेल्या व्‍हिडिओंमुळे पोलिस निश्‍चितच अडचणीत आले आहेत.
Goa Police: कलंकित खाकी वर्दी आणखी संशयाच्‍या घेऱ्यात; नोकऱ्यांच्या नावाखाली राज्यात फोफावला चोरबाजार
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

अवित बगळे

गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून पळालेला की पळवलेला सुलेमान मोहम्‍मद खान ऊर्फ सिद्दीकी याने जारी केलेल्या व्‍हिडिओंमुळे पोलिस निश्‍चितच अडचणीत आले आहेत. पोलिस शिपाई अमित नाईक याला हाताशी धरून सिद्दीकीने हे कांड घडवून आणले असे कालपर्यंत लोकांना वाटत होते. मात्र सिद्दीकीच्या ध्वनिचित्रफितींमुळे पोलिस संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.

नोकऱ्यांच्या चोरबाजार, बनावट प्रमाणपत्रे, पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने फसवणूक, सदनिका देतो म्हणून लुबाडणूक, सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना कॅसिनोवाल्यांनी कोंडणे असे प्रकार अलीकडे उघडकीस आल्याने जनतेला या राज्यात काहीही होऊ शकते असे वाटू लागले आहे. यामुळे अनेक गंभीर आरोप असलेल्या सिद्दीकीच्या ध्वनिचित्रफितीतील माहितीवर जनतेचा आजच्या घडीला विश्‍‍वास बसल्याचे दिसते. विविध व्हॉट्‌स-ॲप ग्रुप समूहावर ही चित्रफीत, व्‍हिडिओ फिरू लागल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यास सिद्दीकीला पळविले गेले असावे असे बहुसंख्य लोकांना वाटतेय असे अनुमान काढता येते.

Goa Police: कलंकित खाकी वर्दी आणखी संशयाच्‍या घेऱ्यात; नोकऱ्यांच्या नावाखाली राज्यात फोफावला चोरबाजार
Goa Police: खाकी वर्दीवर काळे डागच जास्‍त! वर्षभरात 20 पोलिस निलंबित; फसवणूक, लाचखोरी, दादागिरीच्या घटना वाढल्या

ॲड. अमित पालेकर (Amit Palekar) यांच्याकडे पेनड्राईव्ह पोहोचल्यावर त्यांच्या आयपॅडला तो जोडता येत नव्हता असे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालेकर यांनी कवठणकर यांना त्या पेनड्राईव्हमधील माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. ‘आप’ आणि काँग्रेस हे दोन्ही भिन्न पक्ष आहेत. ‘आप’चे पालेकर हे काँग्रेसच्या नेत्‍याला विनंती करतात, आपल्याच पक्षातील नेत्याला त्यांनी ते काम का सोपवले नाही? हाही प्रश्‍‍न उरतोच. या एकंदरीत प्रकरणात बडतर्फ पोलिस शिपाई अमित नाईक याने आपल्याला सिद्दीकीने फसवल्याचा दावा मागे पडला आहे. त्याने आत्महत्येचा केलेला प्रयत्नही फारसा चर्चेत नाही. आता सिद्दीकीला पळवण्यामागे कोणाचा हात, हाच मुद्दा चर्चेत आहे. सिद्दीकी पोलिसांना सापडला नाही तर त्याने केलेले आरोप खरे आहेत हे मानण्यास जागा निर्माण होईल. तोपर्यंत चर्चेला ऊत येईल, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

ॲड. अमित पालेकरांपर्यंत पेनड्राईव्ह कसा पोहोचला?

खरेतर जनता पोलिसांच्या बाजूने उभी राहायला हवी. मात्र तसे दिसत नाही. एका पेनड्राईव्हची ताकद व क्षमता आता कळून चुकली असून त्याच्या झळा संबंधितांना जाणवू लागल्या आहेत. ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर हे योगायोगाने सिद्दीकी याने सादर केलेल्या जामीनअर्जावरील खटल्यात त्याचे वकीलही आहेत. त्यांच्यापर्यंत हा पेनड्राईव्ह पोहोचविण्यता आला होता. त्यांच्या घरचे सीसीटीव्ही तपासल्यास तो कोणी आणून दिला हे उघड होऊ शकते. सिद्दीकीपर्यंत पोहोचण्यासाठी एखादी वाट त्यातूनही मिळू शकते. पोलिस अधीक्षकांच्या कक्षात मारहाण झाल्याचा आरोप सिद्दीकीने केला आहे. त्यामुळे झालेल्या जखमा किंवा मारहाणीच्या खुणा त्याने व्‍हिडिओत का दाखवल्या नाहीत, असा प्रश्‍‍न आता निर्माण झाला आहे.

आता सीसीटीव्‍ही फुटेज सादर करून थोडी तरी अब्रू वाचवा

आपल्‍याला पळवण्यात आले असा दावा सिद्दीकीने केला आहे. कर्नाटकात रात्रीच्‍या वेळी नेताना आपल्या मागेपुढे पोलिस होते असेही त्याचे म्हणणे आहे. आणखीही बरेच दावे त्याने केले आहेत. ते फेटाळण्यासाठी गुन्हे शाखा आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सार्वत्रिक करण्याचे धाडस पोलिस करतील काय, यावरच आता या प्रकरणात त्‍यांची गेलेली अब्रू सावरण्यासाठी मदत होणार आहे. सिद्दीकी ज्‍या मार्गावरून पळाला, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरूनही त्याचा दावा खोडता येणार आहे.

Goa Police: कलंकित खाकी वर्दी आणखी संशयाच्‍या घेऱ्यात; नोकऱ्यांच्या नावाखाली राज्यात फोफावला चोरबाजार
Goa Police And Crime:...आणि 'खाकी'च्या उरल्या-सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघाले; संपादकीय

प्रकरण सीबीआयकडे देणेच योग्‍य

साडेचार वर्षे हाती न लागलेल्‍या सिद्दीकीला आता ‘आम्ही पकडू’ हे पोलिस कोणत्‍या बळावर सांगत आहेत हे समजत नाही. त्याला पकडण्यात आले तेव्हाच त्याला अशा प्रकारे सोडण्यात येईल असे ठरले होते का, याचीही चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जर कोणाचेच हात नसतील तर तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यास काहीच हरकत नसावी. त्‍यामुळे पोलिस व राजकारण्‍यांवरील संशयही दूर होईल. सिद्दीकी हा काही धुतल्या तांदळासारखा नाही. मात्र त्याने केलेल्‍या आरोपांमुळे पोलिसांवर निश्चितच संशयाचे सावट पसरले आहे. ते दूर करणे आता गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com