दहशतवादाबाबत पाकिस्तानचे धोरण कायमच दुटप्पी राहिले असून त्यांची विश्वासार्हता संपली आहे. एकीकडे दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे आणि दुसरीकडे शांततेच्या गप्पा करायच्या हे चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानची खरडपट्टी काढत खडे बोल सुनावले. शांघाय सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गोव्यात बाणावली येथे शांघाय सहकार्य परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत रशिया, चीन यांच्यासह पाकिस्तानसह सात देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये परराष्ट्र रणनीती, शांघाय सहकार्य देशांमधील सुरक्षा, आर्थिक व्यवहार यांबाबतच्या सहकार्यावर विशेष चर्चा झाली.
भारताच्या बाजूने परिषदेच्या सदस्य देशांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान, पारंपरिक औषधे, स्टार्टअप पॉलिसी, बुद्ध वारसा, युवा सशक्तीकरण यासारख्या मुद्द्यांबाबत सहकार्यावर भर देण्यात आला. पण परिषदेमध्ये सर्वांचे लक्ष पाकिस्तान आणि चीनच्या रणनीतीवर होते.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी या बैठकीत दहशतवादाच्या मुद्यासह जम्मू-काश्मीरमधून हटवलेल्या 370 कलमाबाबतही उच्चार केला. पाकिस्तान हा दहशतवादाचा बळी असून पाकिस्तान शांततेची अपेक्षा ठेवत आहे. याबाबत दोन्ही देशांनी एकत्रित येऊन चर्चा करणे अपेक्षित आहे.
या बैठकीच्या निमित्ताने चर्चेला सुरुवात झाली, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी म्हटले. यावर केंद्रीय मंत्री एस. जयशंकर यांनी हल्ला चढवत पाकिस्तान नेहमीच दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे. एकीकडे दहशतवाद्यांना मदत करत त्याला प्रोत्साहन दिले जाते. त्यांना आवश्यक असलेले शस्त्रसाठे आणि इतर बाबी पुरवल्या जातात.
दुसरीकडे शांततेच्या गप्पाही मारल्या जातात, हे थांबले पाहिजे. दहशतवाद आणि शांतता एकत्रितपणे नांदू शकत नाहीत. पाकिस्तान यापूर्वीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अशा प्रकारची भूमिका मांडत आला आहे. आता केवळ ठिकाण वेगळे होते आणि ते गोवा आहे. राजनैतिक फायद्यासाठी दहशतवादाला शस्त्र बनविण्याच्या फंदात त्यांनी पडू नये.
दहशतवादाचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही. सर्व प्रकारांतील दहशतवाद संपवला पाहिजे. दहशतवादाची आर्थिक रसद रोखण्यासाठीही प्रभावी कारवाई आवश्यक आहे. पाकिस्तानचे अंतिम लक्ष्य शांतता आहे की नाही हे माहीत नाही; पण दहशतवाद अंतिम लक्ष्य कधीच साध्य होणार नाही, असेही जयशंकर म्हणाले.
भारत-चीनचे संबंध सुरळीत नाहीत
या बैठकीमध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री गॅंग यांनी भारत चीनच्या सीमेवरील परिस्थिती नॉर्मल आणि स्टेबल असल्याचा उच्चार केला. याबाबत जयशंकर म्हणाले की, भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती सुरळीत नाही. सीमाभागात वारंवार घुसखोरी होत आहे. याबाबत आम्ही संबंधित देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी यापूर्वीही चर्चा केली आहे. ही परिस्थिती सुधारणे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे.
इराण, बेलारूस यापुढे पूर्ण सदस्य
शांघाय परिषदेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून पाच राष्ट्रांपासून सुरुवात झाल्यानंतर आता या परिषदेमध्ये सात पूर्णवेळ सदस्य आहेत. यात आता इराण आणि बेलारूस ही राष्ट्रे पूर्ण सदस्य म्हणून सहभागी होत आहेत. याशिवाय या परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीला मान्यता देण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.