Goa Excise Department: अबकारी खात्याच्या कर रचनेमुळे कर्नाटकापेक्षा गोव्यात दारू खूप स्वस्त मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोव्यातून कर्नाटकात दारूची बेकायदा तस्करी होत असते.
याचा परिणाम कर्नाटकातील अबकारी खात्याच्या करावर होताना दिसत असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अबकारी खात्याला बुडणारा कर वसूल करण्याचे निर्देश दिल्याने अबकारी खात्याने गोव्यातून कर्नाटकातून येणाऱ्या सर्वच चेक नाक्यांवर बंदोबस्त वाढवत तपासणी वाढवली आहे.
गोव्यातून एक जरी दारूची बाटली कर्नाटकात नेली तरी संबंधितावर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा कारवार अबकारी विभागाने दिला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेल्याच आठवड्यात गोव्यातून दारूची तस्करी बंद करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी कारवार येथील अबकारी विभागाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अबकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना गंभीर इशारा दिला आहे.
गोव्यातून होणारी दारू तस्करी थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अबकारी खात्याला दिल्या होत्या.
त्यानुसार कारवार येथे अनमोड, माजाळी अबकारी अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील अबकारी अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत गोव्याच्या सीमेवरील अनमोड, माजाळी मार्गे होणारी दारू तस्करी कशी रोखता येईल, याविषयी चर्चा करण्यात आली.
अनमोड आणि माजाळी मार्गे गोव्यातून कर्नाटकात अवैधपणे मद्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार अशा तस्करांविरोधात कारवाई करूनही तस्करी थांबलेली नाही. या दोन्ही प्रमुख मार्गांसह अन्य चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. त्यावरही कारवाई करण्यासंदर्भात त्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.