Goa Chief Election Officer Meeting: आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये नियोजित असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोव्यात, मंगळवारी बैठक झाली. गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (IAS) हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
पणजीतील अल्तिनो येथे झालेल्या या बैठकीत सर्व राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बैठकीदरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना EVMs-VVPATs च्या फर्स्ट लेव्हल चेकिंग (FLC) बद्दल माहिती दिली. 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2023 या काळात ही चाचणी होणार आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी अल्तिनो येथील सरकारी जिमखानाच्या पहिल्या मजल्यावर याची चाचणी होणार आहे. तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी मडगाव म्युनिसिपल गार्डनसमोरील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात चाचणी पार पडेल.
प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीची चाचपणी घेतली जात असताना राजकीय पक्ष यापुर्वीपासून या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. फोंडा येथे झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेत शाह यांनी दक्षिण गोव्यातील लोकसभेची जागा जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले होते.
गतवेळी म्हणजेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपचे श्रीपाद नाईक निवडून आले. ते सध्या केंद्रात राज्य मंत्री आहेत. तथापि, दक्षिण गोव्यात मात्र भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांना पराभव पत्करावा लागला होता.
काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांनी सावईकर यांचा पराभव केला होता. आता मात्र दक्षिण गोव्याची जागा जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.