म्हापसा: इंग्रज आपल्या भारतभूमीत व्यापार-उदीम करण्यासाठी आले आणि त्यांनीच स्वत:ची इंग्रजी भाषा आमच्या माथी मारली. इंग्रजीमुळेच आमच्या स्थानिक भाषा संपुष्टात आल्या. त्याचाच परिणाम म्हणजे आम्हाला आमच्याच भाषा-संस्कृतीचे विस्मरण झाले. अभ्यासक्रमातूनही चुकीचा इतिहास शिकवला गेला. हिंदू राजाने कधीच शरणागती पत्करली नाही. मोगलाई सत्तेसमोर संघर्ष करून त्यांना रोखले, हा इतिहास लपवला गेला आहे, असे उद्गार चित्रपट कलाकार व नाट्यलेखक योगेश सोमण यांनी काढले. गुढीपाडव्याच्या दिनी येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नववर्ष स्वागत समिती म्हापसातर्फे एकोणिसाव्या गुढीपाडवा उत्सवानिमित्त पहाटे म्हापसा शहरातील अनेक प्रभागांतून मिरवणुका टॅक्सी स्थानकावर एकत्रित झाल्या. ढोल-ताशांच्या गजरात आजची पहाट मंगलमय व उत्साही ठरली होती.
शहरात प्रभातफेरी झाल्यानंतर टॅक्सी स्थानकावर प्रमुख पाहुणे सोमण यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी ग्रामपुरोहित राजू केळकर यांनी मंत्रपुष्पांजलीचे पठन केले. समितीचे अध्यक्ष वैभव राऊळ, सरचिटणीस कौस्तुभ राऊत, उपाध्यक्ष अमेय नाटेकर, प्राची साळगावकर, शुभम पार्सेकर, कृणाल धारगळकर, सायली परब व इतरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. अध्यक्ष वैभव राऊळ यांनी स्वागत केले. तनिषा मावजेकर यांनी ईशस्तवन गायिले. वैभव राऊळ यांच्या हस्ते योगेश सोमण यांना वृक्षसमई देऊन गौरवण्यात आले. दिव्या च्यारी यांनी प्रेरणागीत सादर केले. कौस्तुभ राईत यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.