Ganesh Chaturthi : चतुर्थीच्या सणाला केपेतील नागुर्मा कुडई वाड्याला मिळाली वीज
Ganesh Chaturthi : गोवा हे प्रगतशील राज्य मानले जात असले तरीही अजून काही ठिकाणी या प्रगतीशील राज्यात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं चित्र आहे. याचे उदाहरण म्हंणजे केपे मतदार संघातील नागुर्मा कुडई हा वाडा. या भागात अजून पर्यंत विजेची सोय पोचलेली नव्हती. हे गाव राजधानी पणजीपासून जवळपास 150 किमी दूर आहे.
ना रस्ता ना पाणीपुरवठा अशा परिस्थितीत पाच कुटुंबातील लोक या गावात आपले जीवन जगत आहेत. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सदर कुटूंबीयांना स्वखर्चाने 42 विजेचे खांब आणून देऊन सदर कुटुंबियांना विजेची सोय करून दिली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विजेची सोय उपलब्ध केल्याने याचे उद्घाटन केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केपेचे आमदार डिकॉस्टा म्हणाले की, गोवा मुक्त होऊन आता 60 वर्ष पूर्ण झाली. पण अजून विजेची लोकांना मुलभूत सुविधा प्राप्त होत नाही ही खूपच वाईट गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने प्रत्यक्षात गावोगावी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवून सदर लोकांच्या समस्या दूर करण्याची गरज आहे.
पुढे बोलताना आमदार डिकॉस्टा म्हणाले की, केपे मतदार संघ हा प्रत्येक क्षेत्रात पुढे जाईल अशा पद्धतीने मी काम करणार. लोकांनी कामे करण्यासाठी सदैव मला साथ द्यावी. या लोकांची समस्या खोला पंचायत क्षेत्रातील लोकांच्या आशीर्वादामुळे पूर्ण करण्यास मला यश आले.
लोकांच्या समस्या सोडवण्यास यश येत असलेल्या ठिकाणी कुणीही राजकारण करू नये. प्रत्येक माणसाच्या जिवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुडई खोला येथील मैदानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. खोला पंचायत क्षेत्रातील लोकांनी याचा फायदा करून घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले
विजेची सोय उपलब्ध करुन दिल्याने यावेळी बोलताना रिमा वेळीप म्हणाल्या की, आम्ही गेली अनेक वर्षे चिमणीचा आदर घेत दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची इच्छा असुन देखील आर्थीक समस्येमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. केपेचे आमदार डिकॉस्टा आज निवडून आले नसते तर आम्हाला कधीही विज प्राप्त झाली नसती. त्यांच्यामुळे आज आमचे जीवन प्रकाशमय झालेले आहे. केपेतील लाेकांनी सदैव आमदार डिकॉस्टा सोबत राहून कामे करून घ्यावी. त्यांना गरीब लोकांचे दुःख समजते एखादी गोष्ट हाती घेतल्यास ती पूर्ण होई पर्यंत काम करण्याची क्षमता त्यांच्या मध्ये आहे. त्यामुळे देवाने सदैव अशाच लोकांना राजकीय क्षेत्रात पाठवून लोकांच्या समस्या दूर करण्यास मदत करावी, असेही त्या पुढे म्हणाल्या.
विजेची समस्या दूर व्हावे ह्या हेतूने अनेकवेळी वीज कार्यालयात गेलो पण समस्या दूर होण्याचे नाव घेत नव्हते. आमदार डिकॉस्टामुळे आमच्या जीवनातील अंधार खऱ्या अर्थाने दूर झाला, अशी प्रतिक्रिया नागुर्मा कुडई गावचे नागरिकांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.