
पणजी : झुआरी नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या झुवारी पुलावर लवकरच एक भव्य वेधशाळा मनोरा आकार घेणार आहे. आयफेल टॉवरच्या प्रेरणेने तयार होणाऱ्या या १२५ मीटर उंच मनोऱ्याची पायाभरणी २३ मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत २७०.०७ कोटी रुपये असून, तो गोव्याच्या पर्यटनसौंदर्यात लक्षणीय भर घालणार आहे. या अत्याधुनिक वेधशाळा मनोऱ्यात विशेष आकर्षण असलेले कॅप्सूल लिफ्ट्स, ३६० अंश फिरणारे उपहारगृह, आधुनिक कला दालन, कॅफेटेरिया तसेच दोन्ही बाजूंनी झुवारी नदीवरून जाणाऱ्या ‘वॉकवे’ पुलांचा समावेश असेल.
या अद्वितीय संकल्पनेमुळे पर्यटकांना झुवारी नदी, मांडवीचा संगम, मुरगाव बंदर आणि गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे अवलोकन एका उंच मनोऱ्यातून करता येणार आहे.
सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोवा हे केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता एक समृद्ध आणि बहुआयामी पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटनवृद्धी अन् रोजगारसंधी
वेधशाळेच्या उभारणीमुळे स्थानिक पातळीवर पर्यटन, आतिथ्य, वाहतूक, किरकोळ विक्री व सांस्कृतिक उद्योग क्षेत्रांमध्ये नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे झुआरी पुलाचे रूपांतर केवळ वाहतुकीसाठीच्या माध्यमातून एका पर्यटन आकर्षणात होणार असून, गोव्यातील पर्यटनाला एक जागतिक दर्जाची ओळख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.