मोपा धनगर बांधवांचा दसरा हा मोठा सण. सलग तीन दिवस धनगर बांधव दसरा साजरा करतात. आपट्याची पाने सोनं म्हणून दसऱ्याला वापरली जातात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी माटोळी बांधून, देवपूजेला लावून दसऱ्याची सुरुवात होते या दिवसाला ते जागर म्हणतात. चतुर्थी वेळी जशी माटोळी बांधली जाते तशीच माटोळी बांधतात त्या माटोळीला नारळाची तोरणे बांधतात. प्रत्येक तोरणाला पाच नारळ असतात. त्याच दिवशी कराद्याची फळे व पिठाची पिठली शिजवून नैवेद्य दाखवला जातो. याची चव आणि कुठल्याही पदार्थाला येणे मुश्किलच आहे. देव कांबल ठेवून त्याच्यावर वस्त्रे मांडून पूजेला लावला जातो.
धनगर बांधवांचा नवमीचा दसरा नवरात्रीच्या नऊव्या दिवशी ती वस्त्रे पाण्याने धुऊन देवाला पुन्हा पूजेला लावतात. हा दिवस दसऱ्याचा दिवस असतो. या दिवशी स्वर्गवासी पूर्वजांची आठवण म्हणून ठेवलेल्या पाषाणांची पूजा केली जाते. रात्रीच्या वेळी धनगर बांधव प्रत्येक घरात जाऊन धनगर नृत्य साजरी करतात. सफेद वस्त्र ज्याचं नाव झगा आहे, डोक्यावर पगडी असा विश करून हे नृत्य साजरी करतात. त्यांना साथ द्यायला ढोलाचा आवाज व मुरलीचा स्वर असतो. ताकाने भरलेल्या दुडग्याचे वितरण केले जाते.
नवरात्रीच्या दहाव्या दिवसाला शिलंगण असे नाव धनगर बांधव देतात. या दिवशी सर्व धनगर कुटुंबे देवाला, नवीन शेणाने सारवलेल्या हाडगी मध्ये बसून एका झाडाखाली कांबळीवर पूजा करतात. त्याठिकाणी देखील धनगर नृत्य साजरे करतात. बाहेरील सर्व देवांना नारळ ठेवून सांभाळ करण्यासाठी सांगणे दिले जाते. भांडार, दुडगा, सोनं(आपटा)व कित्येक वस्तूंनी भरलेले देवाचे ताट घेऊन सर्व देवांच्या नावाने आरती केली जाते. सर्वांना नारळाची शेरणी दिली जाते. नंतर रात्रीच्या वेळी ज्या घरात देव पूजेला लावला आहे तिथे जमून तोरणे उतरली जातात. प्रत्येक तोरणाचा एक नारळ काढतात. याची शेरणी प्रत्येक घरात पोहोचवली जाते. हा दसऱ्याचा तिसरा व शेवटचा दिवस असतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.