सुशांत कुंकळ्येकर
यापूर्वी ज्यांनी खनिज मालाच्या हव्यासातून गोव्यातील डोंगर खणून पर्यावरणाचा ऱ्हास केला तेच खनिज माफिया आता रेती माफिया बनले असून सक्शन पंप वापरुन दर दिवशी शेकडो घनमीटर रेती काढू लागल्यामुळे पर्यावरणदृष्ट्या गोव्यातील सर्वांत महत्वाची नदी असलेल्या झुआरी नदीचा काठ उद्ध्वस्त होऊ लागला आहे. हा काठ उद्ध्वस्त झाल्याने काठालगच्या बागायतीही नष्ट होऊ लागल्या आहेत.
गच्या आठवड्यातच गस्त घालणाऱ्या पोलिसांनी अशा चार घटना उघडकीस आणल्याने या भागात बेकायदा रेती उत्खनन किती मोठ्या प्रमाणावर चालले आहे, याचा कुणालाही अंदाज येईल. गेल्या आठवड्यात गोवा कोस्टल पोलिसांनी पंचवाडी येथे केलेल्या कारवाईत एका सक्शन पंपसह चार होड्या आणि ट्रक पकडले होते. त्यानंतर कुडतरी येथे दिवसा ढवळ्या रेती उत्खननाचा प्रयत्न हाणून पाडत सहा होड्या आणि एक सक्शन पंप जप्त केला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शुक्रवार, ८ रोजी कुडचडे पोलिसांनी कुडचडे नदीकाठी लपवून ठेवलेल्या झुआरी नदीतील आठ होड्या पकडल्या. त्यापैकी एका होडीला सक्शन पंपही जोडला हाेता. त्याच दिवशी म्हार्दोळ पोलिसांनी खांडोळा भागात रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईत दोघांना अटक केली.
सध्या गोव्यात रेती उत्खननावर बंदी असली तरी बांधकामासाठी ही रेती लागत असल्याने पंचवाडी, बोरी आणि कुडतरी या तीन भागात सक्शन पंप लावून रेती उत्खनन करण्यावर रेती माफियांनी भर दिला असून दरराेज शेकडो क्युबीक मीटर रेती पोखरून काढली जाते. यासाठी जो सक्शन पंप वापरला जातो त्याची क्षमता एका तासाला २६ क्युबीक मीटर रेती उपसण्याची असल्याने हा विध्वंस किती व्यापक आहे त्याची कल्पना येऊ शकते.
अशा या रेती उत्खननामुळे झुआरी नदीचा काठ दिवसेंदिवस ढासळत चालला असून गोव्यातील पर्यावरणासाठी ही गोष्ट घातक असल्याचे मत यापूर्वी या रेती उत्खननाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलेले रेन्बो वॉरियर्सचे निमंत्रक अभिजीत प्रभूदेसाई यांनी व्यक्त केले. नदीत मध्यभागी सक्शन पंप लावून ही रेती काढली गेल्यामुळे नदीच्या पोटात एक विहिरीसारखा खड्डा निर्माण होतो आणि या खड्ड्यात पुन्हा काठावरील रेती जात असल्यामुळे नदीचा काठ कोसळून काठावरच्या बागायतीही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकांचा उठाव; पण अधिकाऱ्यांचा खो !
यापूर्वी कुडतरीतील बागायतदारांनी हा नदीचा काठ कोसळू लागल्याने आवाज उठवून हा बेकायदेशीर धंदा रोखण्याचे प्रयत्न केले होते. स्थानिकांच्या या उठावाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र, लोकांच्या या प्रयत्नांना सरकारी अधिकाऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा उठाव नंतर थंड झाला. या सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्थेबद्दल अभिजित प्रभूदेसाई यांनी नाराजी व्यक्त करून या रेती माफियांना काही स्थानिक आमदारांचा पाठिंबा आहे. शिवाय पर्यावरणाचा राजरोस विद्ध्वंस होत असतानाही बंदर कप्तान खाते आणि कोस्टल पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात,म्हणूनच या रेती माफियांचे फावले आहे.
पात्र रुंदावतेय
खाण बंदीनंतर खाण माफियांनी आपले लक्ष रेती कडे वळवले असून २०१८ ते २०२२ या कालावधीत या झुआरी नदीत जास्त रेती उत्खनन झाल्याने या नदीला जोडणाऱ्या उपनद्यांचेही पात्र विस्तारू लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.